मुंबई - नागपूरच्या महापालिका आयुक्तपदावरून बदली करत तुकाराम मुंढे यांना मुंबई जीवन प्राधिकरणचा कारभार देण्यात आला होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर मुंढे यांनी अद्याप या प्राधिकरणाचे सचिवपद स्वीकारलेले नाही. तोपर्यंत राज्य सरकारने त्यांची पुन्हा बदली केल्याचे समजते. मात्र, नागपूर महापालिकेत आज तुकाराम मुंढेंचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे, गेल्या 7 महिन्यांपासून नागपूर शहराची आणि नागपूरकरांची सेवा करताना अनेक अनुभव आल्याचे सांगत जड अंत:करणाने आपला निरोप घेत असल्याचे तुकाराम मुंढेंनी म्हटले.
तुकाराम मुंढेंनी ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, नागपूरबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी गेल्या 7 महिन्यात या शहरातीसाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने अनेक कामे करु शकलो, तर काही प्रोजेक्ट बाकी राहिले याची खंतही मुढेंनी बोलून दाखवली. त्याचसोबत, माझ्या ह्रदयात तुम्हा सर्वांचे स्थान आहे, तुमच्या ह्रदयातही मला ठेवा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच, शासन, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येत कामं केली पाहिजे. मी नागपूरमधून जड अंत:करणाने जात आहे, पण माझ्या घराची दारी आपणासाठी सदैव खुली असतील, असेही भावनिक आवाहन तुकाराम मुंढेंनी आपल्या व्हिडिओत केलं आहे.
नागपूरनंतर पुन्हा बदली
तुकाराम मुंढे यांना मुंबई जीवन प्राधिकरणाचा कार्यभार देण्यात आला होता. याठिकाणी रुजू होऊ नका, असा संदेश राज्य सरकारने दिला आहे. तर मुंबई जीवन प्राधिकरणचा अतिरिक्त कार्यभार मदत व पुनर्वसनचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने आज दिले आहेत. एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर तसेच ई रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांना कोणते पद मिळणार ते जाहीर केलेले नाही. त्यांच्याकडे आता कोणती जबाबदारी देण्यात येणार याबद्दल उत्सुकता आहे. तुकाराम मुंढे यांचा नागपुरातील कार्यकाळदेखील वादग्रस्तच राहिला. लोकप्रतिनिधींनी सातत्याने त्यांच्याविरोधात भूमिका घेतली. इतकेच काय तर त्यांच्यावर ‘हुकूमशहा’ अधिकारी अशीदेखील टीका करण्यात आली. दुसरीकडे ‘कोरोना’ संसर्गासंदर्भात मुंढे यांनी सुरुवातीच्या काळातच तातडीची पावले उचलली होती. त्यामुळे सुरुवातीची चार महिने नागपुरात ‘कोरोना’चा संसर्ग नियंत्रणात राहिला होता. मागील काही काळापासून मुंढे विरुद्ध लोकप्रतिनिधी हा संघर्ष पेटला होता. नागपुरचे महापौर संदीप जोशी यांनीदेखील मुंढे यांच्याविरोधात भूमिका घेतली होती.