बसपा समीक्षा बैठक : वीरसिंग यांची टीका नागपूर : ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणारे मोदी सरकार लोकांना मूर्ख बनवित आहे. अच्छे दिन केवळ उद्योगपती आणि श्रीमंतांचेच आले आहे, सर्वसामान्य जनता अजूनही महागाईने त्रस्त आहे, अशी जाहीर टीका बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. वीरसिंग यांनी येथे केली. बहुजन समाज पार्टीतर्फे मेडिकल चौक उंटखाना येथील अजिंठा हॉल येथे शुक्रवारी विदर्भस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड, उपाध्यक्ष कृष्णा बेले, जितेंद्र म्हैसकर, प्रेम रोडेकर, दादाराव उईके, संदीप ताजणे प्रमुख अतिथी होते. खा. वीरसिंग म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी जनतेला खूप आश्वासने दिली होती. अच्छे दिनचे स्वप्न दाखविले होते. प्रत्येक गरीब व्यक्तीच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु यापैकी काहीही झाले नाही. उलट सामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे. तेव्हा अपेक्षाभंग करणाऱ्या या सरकारला धडा शिकवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पुढे ते म्हणाले, पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या बाजूने बसपाने संसदेत नेहमीच आवाज उचलला आहे. परंतु शिवसेना व सपाने नेहमीच विरोध केला आहे. ओबीसी आणि एससी, एसटीच्या लोकांसाठी बसपा नेहमीच लढत आहे, परंतु ओबीसी समाज अजूनही बसपाशी जुळलेला नाही. तेव्हा महाराष्ट्रातील बहुजन समाजाने ओबीसीसोबत यावे, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी विलास गरुड यांच्यासह उपस्थित प्रमुख पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी नागोराव जयकर, सागर डबरासे, उत्तम शेवडे, विश्वास राऊत, नाना देवगडे, हरीश बेलेकर, पृथ्वीराज शेंडे, विवेक हाडके, रुपेश बागेश्वर, उमेश म्हैसकर, मोहन राईकवार, सुनील डोंगरे, मिलिंद बन्सोड, मो. जमाल, आनंद सोमकुंवर, चंद्रशेखर कांबळे, अनिल मेश्राम, नितीन शिंगाडे, प्रशांत पाईक, जितेंद्र घोडेस्वार प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
श्रीमंत व उद्योगपतींचेच अच्छे दिन
By admin | Published: September 05, 2015 3:24 AM