लाेकमत न्यूज नेटवर्क
हिवराबाजार : काेराेना संक्रमण आणि लाॅकडाऊन काळात छाेटे दुकानदार व व्यापारी, त्यांच्याकडे व हाॅटेलमध्ये काम करणारे कामगार कमालीचे त्रस्त झाले असताना माेहफुलाची दारू काढणारे, ही व देशीदारूची अवैध दारू विक्री करणारे तसेच सट्टापट्टीवाल्यांना ‘अच्छे दिन’ आले. कारण या अवैध दारू विक्री व धंदेवाल्यांनी याच काळात चांगला पैसा कमावला असून, त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क व पाेलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.
रामटेक तालुक्यातील देवलापार व हिवराबाजार हा परिसर पूर्णपणे आदिवासीबहुल आहे. काेराेना संक्रमण व लाॅकडाऊन काळात या भागातील दुकानदारांनी त्यांची दुकाने, हाॅटेल स्वत:हून दीर्घकाळ बंद ठेवली हाेती. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्याकडे काम करणारे कामगार आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले हाेते. दुसरीकडे, याच काळात हिवराबाजार परिसरात माेहफुलाच्या अवैध दारू विक्री आणि सट्टापट्टीने उचल घेतली हाेती. हा प्रकार या भागात आजही माेठ्या प्रमाणात सुरू आहे.
या भागात माेठ्या प्रमाणात माेहफुलाच्या दारूभट्ट्या असून, येथील दारू शहरांमध्येही विक्रीसाठी पाठविली जाते. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांकडे दारू पिणाऱ्यांची रांगही दिसून येते. या काळात पानटपरीवाले, पंक्चर व सायकली दुरुस्त करणारे, दुचाकी मेकॅनिकल, वर्कशॉप, जनरल स्टोअर, रेडिमेड कपड्यांच्या दुकानदारांसह इतर छाेटे व्यावसयिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने त्यांच्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले आहे.
...
पार्सलच्या नावाखाली दारू विक्री
हल्ली या भागातील प्रत्येक गावात चार ते पाच ठिकाणी सट्टापट्टी खुलेआम स्वीकारली जात आहे. यातील काही व्यवहार प्रत्यक्ष तर काही फाेनवर केले जात आहेत. शासनाने हाॅटेल बंद ठेवण्याचे व पार्सल व्यवस्था सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गालगतचे काही धाबे सुरू असून, तिथे जेवणाच्या पार्सलच्या नावाखाली ग्राहकांना दारूच्या बाटल्याही पुरविल्या जातात. काही धाब्यावर बसून (लपून) जेवण करण्याची व दारू पिण्याची साेय करण्यात आली आहे. ही दारू चढ्या भावाने विकली जात आहे.
...
बाेगस डाॅक्टरांची कमाई
ग्रामीण भागात बाेगस डाॅक्टरांनाही प्रतिष्ठा लाभली आहे. काेराेना संक्रमणाच्या भीतीमुळे ग्रामीण भागातील नागरिक शासकीय रुग्णालयात औषधाेपचारास जात नाही. शासकीय दवाखान्यात गेल्यास काेराेना पाॅझिटिव्ह सांगितले जात असल्याचा गैरसमज त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. ताप, खाेकला, सर्दी असल्यास नागरिक बाेगस डाॅक्टरांकडे जाऊन उपचार करवून घेतात. या बाेगस डाॅक्टरांनीही गरिबांकडून अतिरिक्त पैसे उकळले आहे. जीवघेणे उपचार करणाऱ्या या डाॅक्टरांकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही.