भिवापूर : लग्नसराईच्या दिवसांत गतवर्षी कोरोनाचे आगमन झाले. त्यात सलग पाच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे लग्नकार्ये थांबली. आता अनलॉकनंतर अनेकांनी धूमधडाक्यात लग्नकार्ये सुरू केली आहेत. लग्नातील या गर्दीने कुठे हजार तर कुठे दोन हजारांचा आकडा पार केला आहे. या गर्दीतूनच कोरोनाला निमंत्रण मिळत असून आता शुभमंगल ‘सावधान’ म्हणण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच प्रशासनाने ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू केली. जिल्ह्यात डिसेंबर ते जानेवारी महिन्यात कोरोना बहुतांशी नियंत्रणात आलेला होता. रुग्णांची संख्याही रोडावली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात कोरोनाने तोंड वर काढले आहे. उपराजधानी नागपूरमध्ये कोरोनाचे संकट फोफावत आहे. अशात गर्दीची ठिकाणे आव्हान देणारी आहेत. गतवर्षी लॉकडाऊनमुळे लग्नकार्ये थांबल्याने या वर्षी लग्न समारंभाची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागात तर दररोज दोन-चार लग्ने आणि त्यात हजारांवर उपस्थितांची गर्दी एक प्रकारे कोरोनाला निमंत्रण देत आहे.
जिल्ह्यात शेवटच्या टोकावर असलेल्या भिवापूर तालुक्यातही कोरोनाने प्रवेश केला. त्यातही कर्तबगार अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांची संख्या आटोक्यात होती. आता कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही लग्न समारंभातील गर्दी थांबण्याचे नाव नाही. सकाळी लग्न आणि सायंकाळी स्वागत समारोह या दोन्ही कार्यक्रमांत उसळणारी गर्दी शहरवासीयांना भयभीत करणारी आहे. मात्र या गर्दीपासून प्रशासन गाफील असावे हे आश्चर्यच म्हणावे लागेल.
मास्क, सॅनिटायझर, डिस्टन्सिंग कुठाय?
आयोजित लग्न समारंभात उपस्थितांच्या तोंडावरील मास्क गायब झालेला आहे. आयोजकांकडून सॅनिटायझरची व्यवस्थाही केली जात नाही. फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. ही चिंतेची बाब आहे.
कारवाई करा
लॉकडाऊन शिथिल होत असताना अनेकांनी मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकले. दरम्यान, गर्दी केल्यास आयोजकांसह संबंधित मंगल कार्यालयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. लग्नकार्यासाठी परवानगी घेणे महत्त्वाचे होते. त्याचप्रमाणे आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे गर्दी वाढविणारे आयोजक व मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. नागपूर शहरात कारवाईचे सत्र सुरू असून ग्रामीण भागात गर्दी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई का होत नाही, हा प्रश्नच आहे.