नागपूर : शुक्रवार १० सप्टेंबरला घराेघरी श्रीगणेशाचे आगमन व पूजन हाेणार आहे. या दिवशी ग्रहांचे अत्यंत दुर्लभ याेग बनत आहेत. हे याेग व्यापारीवर्गाला लाभदायक असून रवियाेग असतानाचे गणेश पूजन अत्यंत मंगलमय ठरणार असल्याचे ज्याेतिषाचार्य डाॅ. अनिल वैद्य यांनी सांगितले.
आज नवग्रहातील सहा ग्रह आपल्या सर्वाेत्तम स्थितीत राहणार आहेत. बुध आपल्या स्वराशीत म्हणजे कन्या राशीत राहणार आहे. शुक्र तुला राशीत, राहु वृषभ राशीत, केतू वृश्चिक राशीत, शनि मकर राशीत तर सूर्य सिंह राशीतून भ्रमण करणार आहे. कित्येक वर्षांनंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी चित्रा आणि स्वाती नक्षत्राबराेबर रवियाेग बनणार आहे. आज, दुपारपर्यंत चित्रा नक्षत्र व नंतर स्वाती नक्षत्र राहणार आहे. रवियाेग ९ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजता सुरू झाला असून ताे गणेश चतुर्थीच्या दिवशी दुपारी १२.५७ वाजतापर्यंत राहणार आहे. हा दुर्लभ याेग असताना काेणतेही नवीन कार्याचा आरंभ किंवा गणेश पूजन मंगलकारी राहील.
श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही. मात्र सर्वाेत्तम मुहूर्त सकाळी ११.०३ वाजतापासून दुपारी १.३३ वाजतापर्यंत म्हणजे २ तरा ३० मिनिटांपर्यंत असेल म्हणजे यावेळी अभिजित मुहूर्तावर गणेश पूजन करण्याची संधी प्राप्त हाेणार आहे. या दिवशी सकाळी ११.०८ वाजता भद्रा सुरू हाेत असून रात्री ९.५८ वाजतापर्यंत राहिल. ही पातालनिवासिनी भद्रा असून अत्यंत शुभ फलदायी आहे. भद्रचा पृथ्वीवर अशुभ प्रभाव नसताे. त्यामुळे भद्रा काळात गणेश पूजन करण्याचा लाभ व पुण्य मिळेल, असे मत डाॅ. वैद्य यांनी व्यक्त केले.