गणेश हूड नागपूर : जिल्हयात २४२३ अंगणवाड्या आहेत. यात २१६१ अंगणवाड्या आणि २६२ मिनी अंगणवाड्या आहेत. यातील ६३७ अंगणवाड्यांना स्वत: च्या इमारती नाही. यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने निधीची मागणी केली होती. यातील २२ अंगणवाड्या व १०३ मिनी अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीने १३ कोटी ७५ लाखांचा निधी उपलब्ध केला आहे.२२ अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी २ कोटी ४७ लाख तर १०३ मिनी अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी ११ कोटी २८ लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
गतकाळात कोरोनामुळे दोन वर्षांपासून अंगणवाड्या जवळपास बंदच होत्या. या कालावधीत विकास कामेही ठप्पच होती. त्यामुळे अंगणवाड्यांचे बांधकामही ठप्प होते. त्यात स्थगितीमुळे मागील आठ महिन्यापासून जिल्हयातील विकास कामे थांबली होती. याचा फटका अत्यावश्यक कामांनाही बसला आहे. ग्रामीण भागातील अंगणवाड्यातील बालकांना नाईलाजाने खुल्या जागेचा वापर करावा लागतो. जिल्हयात २४२३ अंगणवाड्या आहेत. मात्र यातील ५३१ अंगणवाड्यांत शौचालयाची सुविधा नाही. काही ठिकाणी तर पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध नसल्याने बेअरवेलचे पाणी पीत असल्याचे चित्र आहे. एकात्मिक बाल विकास कार्यक्रमांर्गत अंगणवाड्यांचे संचालक केले जाते. ६३७ अंगवाड्यांना स्वत:च्या इमारती नाहीनियमानुसार १ हजार लोकसंख्येमागे एक अंगणवाडी सुरू करणे अपेक्षित आहे. जिल्हयात सध्या २४२३ नियमित व मिनी अंगणवाड्या सुरू आहेत. यात हजारो बालकांना शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यातील ६३७ अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत नाही. परिणामी सरकारी शाळा, समाज मंदीर, ग्रामपंचायत कार्यालय अशा ठिकाण एका खोलीत काही अंगणवाड्या सुरू आहेत. जवळपास ३०० अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत सुरू आहेत. अशा ठिकाणी कुठल्याही स्वरुपाच्या मुलभूत सुविधा नाही. ...