मेहा शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असल्यामुळे वेळेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे़ या काळात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी कोरोनाचे तातडीने निदान होणे आवश्यक आहे़ नीरीच्या शास्त्रज्ञांनी हे शक्य करून दाखवले आहे़ ड्राय स्वॅब टेस्टिंगच्या माध्यमातून कोरोनाचे तीन तासांत निदान होत आहे़ नीरीच्या शास्त्रज्ञांनी आतापर्यंत अशा ५४ हजार टेस्ट केल्या आहेत़
पर्यावरण विषाणूशास्त्र कक्षाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ़ कृष्णा खैरनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्राय स्वॅब टेस्टिंगमुळे केवळ वेळ वाचत नाही, तर पैसे व मनुष्यबळाचीही बचत होते़ सध्या देशात सर्वत्र आरटीपीसीआर टेस्टिंग सुरू आहे़ त्यात कोरोना विषाणूला सुरक्षित ठेवण्यासाठी विशिष्ट द्रवाचा उपयोग केला जातो़ ड्राय स्वॅब टेस्टिंगमध्ये संबंधित द्रवाची गरज नाही़ या पद्धतीत ४ डिग्री तापमानातील रिकामी ट्यूब वापरली जाते़ ही ट्यूब सहज हाताळता येते़ त्याद्वारे संक्रमण होण्याची शक्यता शून्य टक्के आहे़ ही पद्धत केवळ नीरी लॅबमध्ये वापरली जात आहे़ ही पद्धत सोपी असून या चाचणीचे ४० प्रयोगशाळांच्या तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़ त्यानंतरही ही पद्धत वापरण्यास उदासीनता दाखवली जात आहे़ या टेस्टमुळे कोरोना चाचणीचा खर्च अर्ध्यावर आला आहे़
नागपूरमध्ये वापरण्याचा विचार
येणाऱ्या काळात ही कोरोना चाचणी पद्धत नागपूरमध्ये वापरण्याचा विचार केला जाईल़ ही पद्धत सोयिस्कर असून तिला आयसीएमआरने मान्यता प्रदान केली आहे़
--- राधाकृष्णन बी़, महानगरपालिका आयुक्त़