लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. दरवर्षी पाणीपट्टीत होणारी ५ टक्के दरवाढ २०२१-२२ या वर्षात होणार नाही. कोरोना संक्रमणामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका आयुक्तांनी या दरवाढीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्ष २०२१-२२ करिता प्रचलित ५ टक्के पाणीपट्टी दरवाढीला २९ एप्रिल २०२१ रोजी मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार वाढीव दराने पाणीपट्टी आकारली जाणार होती. मात्र कोरोनाची परिस्थिती विचारात घेता केलेल्या दरवाढीला आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी स्थगिती दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत माहितीसाठी ठेवण्यात आला आहे.
नागपूर शहराची लोकसंख्या ३५ लाखांच्या आसपास आहे. ७ लाखांहून अधिक मालमत्ता आहेत. शहरात ३ लाख ७२ हजार अधिकृत नळधारक आहेत. मागील वर्षी १५७ कोटींच्या डिमांड काढण्यात आल्या होत्या. यात यंदा ५ टक्के वाढ गृहीत धरली तर नागरिकांवर ७ कोटी ५० लाख ३५ हजारांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडला असता. परंतु करवाढीला स्थगिती दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
....
२ लाख अवैध नळ कनेक्शन
नागपूर शहरात दोन लाखांहून अधिक अवैध नळजोडण्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होते. याला आळा घालण्याची गरज आहे. दरवाढी टळल्याने होणाऱ्या नुकसानीच्या तुलनेत अवैध नळधारकांकडून होणारे आर्थिक नुकसान मोठे आहे. अवैध नळ अधिकृत केल्यास मनपाचा महसूल ४० ते ५० कोटींनी वाढू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
...
गळतीमुळे अधिक नुकसान
नागपूर शहरात ३५०० कि.मी. लांबीच्या पाइपलाइन नेटवर्कच्या माध्यमातून घरापर्यंत पाणीपुरवठा केला जातो. एकूण ३ लाख ७२ हजार पाणी ग्राहक आहेत. शहरातील लोकसंख्या विचारात घेता ही संख्या कमी आहे. पाणीचोरी व गळती मोठ्या प्रमाणात असल्याने मनपाला मोठे नुकसान सोसावे लागत आहे.
नागपूर शहराची लोकसंख्या - ३५ लाख
शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा - ६५० एमएलडी
शहरातील मालमत्ता - ७ लाख
अधिकृत नळधारक - ३.७२ लाख
गेल्या वर्षातील डिमांड -१५७ कोटी
दरवाढी झाली असती तर डिमांड - १६४.५० कोटी