()
नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून शहरातील तलावांवर गणपती विसर्जनास अटकाव घातल्यामुळे तलावातील पाण्याच्या गुणवत्तेत सुधार झाला आहे. नागपुरातील ग्रीन विजिल फाउंडेशन या संस्थेने शहरातील ४ तलावांतील पाण्याचे परीक्षण केले. त्यांच्या निरीक्षणात पाण्याच्या गुणवत्तेत सुधार झाल्याचे निदर्शनास आले आहे.
तलावातील पाण्याची गुणवत्ता ही पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण, गढूळपणा व पाण्यातील क्षाराचे प्रमाण या आधारावर नोंदली जाते. ही संस्था गेल्या ९ वर्षांपासून पाण्याची गुणवत्ता परीक्षणाचे काम करते. गणपती विसर्जनापूर्वी, विसर्जनानंतर व फेब्रुवारी महिन्यात अशा तीन वेळा परीक्षण केले जाते. संस्थेद्वारे हा डाटा अर्थइको इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेला पाठविला जातो. ‘अर्थइको’ ही संस्था दरवर्षी देशातील नदी व तलावांच्या गुणवत्तेचा डाटा प्रकाशित करते. ग्रीन विजिलचे मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, सुरभी जैस्वाल यांनी हे परीक्षण केले.
- तीन तलावातील पाण्याची स्थिती
तलाव ऑक्सिजनचे प्रमाण गढूळपणा क्षार
फुटाळा तलाव ४.५ मि.ग्रा.प्रति लीटर ५० जेटीयू ८ पीएच
गांधीसागर तलाव ४.५ मि.ग्रा.प्रति लीटर ७० जेटीयू ८.२ पीएच
सोनेगाव तलाव ४.५ मि.ग्रा.प्रति लीटर ६५ जेटीयू ८ पीएच
- सक्करदरा तलावाची स्थिती वाईट
या परीक्षणात सक्करदरा तलावाची स्थिती अतिशय खराब आढळली. तलावात पाणी खूप कमी आहे. चारही बाजूने जलकुंभी, गवत पसरले आहे. तलावातील पाण्यात ऑक्सिजनची मात्र ३ मि.ग्रा.प्रति लीटर आढळली आहे. गढूळपणा ५५ जेटीयू नोंदविण्यात आला आहे. क्षारचे प्रमाण ७.८ पीएच आढळले आहे.
- गेल्या काही वर्षात गणपती विसर्जनापूर्वी घेतलेल्या निरीक्षणात यावर्षी फुटाळा, गांधीसागर, सोनेगाव तलावात सुधार दिसून आला आहे. तलावातील ऑक्सिजनची मात्रा वाढविण्यासाठी कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यासाठी तलावात फाऊंटेन लावणे गरजेचे आहे. शिवाय गणपती विसर्जन जसे बॅन केले. तसेच इतरही ज्या सणांमध्ये विसर्जन करण्यात येते. तेसुद्धा थांबविणे गरजेचे आहे.
सुरभी जैस्वाल, टीम लीडर, ग्रीन विजिल फाउंडेशन