नागपूर : अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून तीन ते सहा वर्षांची मुले, गर्भवती महिला आणि अन्य पात्र असलेल्या तरुणींना मिळणाऱ्या रेशनमधून खाद्यतेल गायब झाले आहे. त्यामुळे तेलाऐवजी आता साखर दिली जात आहे. महामारीचे संकट, बेराेजगारी आणि नाईलाज यामुळे यासंदर्भात लेखी स्वरूपात तक्रारी आलेल्या नाहीत. मात्र, आहारासाठी आवश्यक असणारे सर्व रेशन दिले जात असताना खाद्यतेलापासूनच वंचित कशाला ठेवले, असा प्रश्न काही लाभार्थ्यांकडून विचारला जात आहे.
लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून तांदूळ, गहू, चणा, मटर, हळद, मिरची पावडर, मीठ, साखर दिली जात आहे. काही महिन्यापूर्वी खाद्यतेल दिले जायचे. मात्र पेट्राेल व डिझेलच्या दरापेक्षा नेहमी कमी दर असणारे खाद्यतेल मागील सव्वा वर्षाच्या काळात एकदम दुप्पट झाले आहे. यामुळे या वस्तूंच्या यादीमधून खाद्यतेल हटविले असावे, असा अंदाज आहे. यासंदर्भात बालविकास अधिकारी सचिन जाधव यांना विचारणा केली असता ते म्हणाले, तेलाऐवजी आता साखर दिली जात आहे. सूचनेनुसारच ही अंमलबजावणी केली जात आहे.
...
फोडणी कशाने द्यायची?
भाजी करण्यासाठी फोडणीसाठी अर्थातच गोडेतेलाची गरज असते. मात्र तेल दिले जात नसल्याने आता फोडणी कशाने द्यायची, असा गमतीदार प्रश्न विचारला जात आहे. अंगणवाडीमधून तांदूळ दिले जातात, मात्र त्यात कचरा अधिक असतो, अशीही तक्रार आहे.
...