नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: सोमवारपासून सुरू झालेल्या नागपूर- इंदूर- नागपूर वंदे भारत ट्रेनला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद देणे सुरू केले आहे. ही ट्रेन सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गाडीत प्रवाशांची संख्या वाढल्याचे दिसून आले. आधी छत्तीसगडमधील बिलासपूर आणि आता मध्यप्रदेशमधील इंदूर अशा दोन राज्याच्या महानगरातून नागपूरला वंदे भारत ट्रेनच्या रुपात जलदगती तसेच आरामदायक प्रवासाची सुविधा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही राज्यातून दररोज नागपूरात वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, रेल्वेच्या लेटलतिफीमुळे अनेक प्रवाशांचे खास करून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यात बहुतांश रेल्वेगाड्यात गर्दीही खूप असते. त्यामुळे मध्य प्रदेशातील विविध महानगरातील प्रवाशांना जाण्यायेण्यासाठी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात यावी, अशी अनेक दिवसांची मागणी होती.
या मागणीला मंजुरी देऊन रेल्वे बोर्डाने सोमवारी ९ ऑक्टोबरपासून इंदूर - नागपूर - इंदूर ही ट्रेन सुरू केली. या ट्रेनचा मध्य प्रदेशसोबतच महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि खास करून नागपूर विदर्भातील प्रवाशांना खूप फायदा झाला आहे. विश्व प्रसिद्ध उज्जैनच्या बाबा महाकालचे दर्शन घेण्यासाठी ही ट्रेन प्रवाशांसाठी पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी या ट्रेनला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. आज मंगळवारी दुपारी ही ट्रेन इंदूरहून नागपूरला पोहचली. त्यावेळी तीत ९१ प्रवासी होते. तर, इंदूरकडे निघताना मात्र या गाडीत नागपूरहून १३२ प्रवाशांनी तिकिट काढले. वंदे भारत एक्सप्रेसला दुसऱ्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याने रेल्वे प्रशासनाला हुरूप आला आहे. प्रवाशांची संख्या पुढे वाढतच राहिल, असा विश्वास रेल्वे अधिकारी व्यक्त करीत आहेत.
बाबा महाकालच्या भस्म आरतीसाठी योग्य वेळ
उज्जैनच्या जगप्रसिद्ध बाबा महाकाल मंदीरातील भस्म आरतीत सहभागी होण्यासाठी या गाडीची वेळ अत्यंत चांगली असल्याची प्रतिक्रिया उज्जैनला जाणाऱ्या भाविकांनी दिली आहे.
भाडे जरा जास्तच
वंदेभारत एक्सप्रेसला ८ कोच असून प्रवाशांची क्षमता ४७८ एवढी आहे. बसचा प्रवासही आरामदायक आहे. मात्र, प्रवास भाडेही जरा जास्तच असल्याचे प्रवासी म्हणतात.