राकेश घानोडेनागपूर : शहरातील गुगल लॅण्ड डेव्हलपर्सने एका ग्राहकासोबत अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला, असे ताशेरे अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने संबंधित प्रकरणावरील निर्णयात ओढले. त्यामुळे या डेव्हलपर्सला जोरदार चपराक बसली.
डेव्हलपर्सने सर्व कायदेशीर परवानग्या घेऊन ले-आऊट विकसित करणे आणि तक्रारकर्त्या ग्राहकाला भूखंडाचे विक्रीपत्र करून देणे आवश्यक होते. असे करणे अशक्य होते तर, त्यांनी ग्राहकाची रक्कम परत करायला हवी होती. परंतु, त्यांनी भूखंडाचे विक्रीपत्र केले नाही व ग्राहकाला त्याची रक्कमही परत केली नाही. ही कृती सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब दर्शविते, असे आयोग म्हणाले.
बाखरी (पिपळा), ता. पारशिवनी येथील विनायक पांडे यांनी गुगल लॅण्ड डेव्हलपर्सच्या नारा येथील ले-आऊटमधील एक भूखंड सहा लाख ५० हजार रुपयांत खरेदी करण्यासाठी १६ सप्टेंबर २०१७ रोजी करार केला होता. दरम्यान, त्यांनी १२ जुलै २०१८ पर्यंत डेव्हलपर्सला ३ लाख ७५ हजार रुपये अदा केले व त्यानंतर सर्व उर्वरित रक्कम देण्याची तयारी दाखवून भूखंडाचे विक्रीपत्र करून मागितले. परंतु, डेव्हलपर्सने त्यांना विक्रीपत्र करून दिले नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीवर आयोगाचे अध्यक्ष सतीश सप्रे व स्मिता चांदेकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. आयोगाने रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून डेव्हलपर्सवर वरीलप्रमाणे ताशेरे ओढले. तसेच, ग्राहकाचे ३ लाख ७५ हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करा आणि त्यांना शारीरिक-मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी ५५ हजार रुपये भरपाई द्या, असे आदेश डेव्हलपर्सला दिले.