नागपूर : उत्तर नागपुरातील कुख्यात गुंड शेर खान याने साथीदाराच्या मदतीने एका युवकाची हत्या केली. यशोधरा पोलिसांनी शेर खान व त्याचा साथीदार फरदीन खान यांना अटक केली आहे.
मृताचे नाव इमरोज ऊर्फ इम्मू रसीद कुरेशी (२०) हमीदनगर आहे. शेर खान याच्याविरुद्ध हत्येचे ७ गुन्हे दाखल आहेत. तो २५ जून रोजी एमपीडीए संपवून कारागृहाच्या बाहेर आला होता. त्याची इम्मूसोबत जुनी ओळख होती. इम्मू गॅरेजमध्ये मेकॅनिक होता. शेर खान याचा संशय होता की इम्मू त्याचा विरोधक माऊजर सोबत मिळलेला आहे व माऊजरला माहिती देऊन त्याला मदत करतो आहे.
रविवारी रात्री ११.३० वाजता इम्मू व त्याचा मित्र शाबाद अली हे घरासमोर फिरत होते. त्यावेळी शेर खान व त्याचा मित्र फरदीन खान दुचाकीने तेथे आले. शेर खानने इम्मूला फिरण्याचा बहाणा करून सोबत घेऊन गेला. इम्मूने घरच्यांना शेर खानसोबत जात असल्याचे सांगून तो निघून गेला. इम्मू गाडी चालवत होता व त्याच्या मागे शेर खान बसला होता. दुसऱ्या दुचाकीवर शेर खानचा मित्र फरदीन व शादाब बसला होता.
चौघेही इंदिरानगर होत संजय गांधीनगरात पोहचले. सिद्धार्थ बुद्धविहाराजवळ शेर खान इम्मूला धमकावीत होता. त्यामुळे इम्मूनेही शेर खानला शिवीगाळ केली. दरम्यान, शेर खानने इम्मूच्या गळ्यावर चाकूने वार केला. जखमी झाल्याने इम्मू गाडीसह खाली पडला. शेर खान याने पुन्हा त्याच्यावर हल्ला केला. इम्मूने तेथून पळण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला शक्य झाले नाही. शेर खानबरोबर फरदीननेदेखील त्याच्यावर हल्ला केला. त्यामुळे शादाबने तेथून पळ काढला. त्याने इम्मूच्या वडिलांना सूचना दिली. याचदरम्यान घटनास्थळाजवळ राहणाऱ्या युवकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी इम्मूला रुग्णालयात पोहचविले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी शेर खान व त्याच्या साथीदाराचा शोध घेऊन त्यांना अटक केली.
या घटनेमुळे यशोधरा ठाण्याच्या परिसरात दहशत पसरली आहे. काही दिवसांपासून येथे खुनाचे गुन्हे वाढले आहे. शेर खान कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने अल्पवयीन असतानाच २०१७ मध्ये खून केला होता. त्याचा माऊजर याच्यासह काही गुन्हेगारांसोबत जुना वाद आहे. याची माहिती पोलिसांना नसणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे इम्मूला जीव गमवावा लागला. इम्मू हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील खासगी वाहनावर कंडक्टर आहेत. त्याच्या कुटुंबात आई व लहान बहीण आहे.