लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील सक्रिय गुंडांची आता खैर नाही. येत्या काही दिवसात पोलीस शहरातील सक्रिय गुंडांना वेसण घालण्यासाठी कठोर पाऊल उचलणार असून प्रभावी उपाययोजनाही करणार आहेत. नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही बाब स्पष्ट केली. बुधवारी पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.डॉ. उपाध्याय यांनी सांगितले, गुन्हे शाखा आणि शहर वाहतूक पोलीस हे सर्वात महत्त्वाचे घटक असतात. ते प्रभावी असणे आवश्यक असते. यासाठी जे काही शक्य असेल ते केले जाईल. शहरात काही दिवसांपासून गुंडांवरील नियंत्रणाचे काम थंड पडले आहे. मकोका आणि इतर सराईत गुन्हेगार फरार होऊन गुन्हे करीत आहेत. गोळीबारासारख्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग वाढला आहे. परंतु शहर पोलीस मूकदर्शक बनले आहे. मकोका लागल्यानंतरही गुन्हेगार सक्रिय कसे, असा प्रश्न डॉ. उपाध्याय यांना विचारला असता ते म्हणाले की, त्यांचे धोरण गुंडांना वेसण घालण्याचे आहे. गुंड काहीच करू शकणार नाहीत, अशी परिस्थिती लवकरच निर्माण झाल्याचे लोकांना दिसून येईल. कुठल्याही प्रकरणात योग्य कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असते. गुंडांना वेसण घालण्यासाठी मकोका अतिशय परिणामकारक आहे. त्याचा योग्य उपयोग होणे गरजेचे आहे. अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांचा आश्रय असेल तर त्याच्याविरही निलंबनाची कारवाई केली जाईल. ग्रामीण पोलीसमध्ये कार्यरत असताना त्यांनी हा ‘फॉर्म्युला’ वापरला होता.गुन्हेगारी रोखण्याच्या उपायांवर चर्चा करताना डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, गुन्ह्यामधील ५ ते १० टक्के लोकं सराईत गुन्हेगार असतात. तुरुंगात कार्यरत असताना कैद्यांना भेटल्यानंतर त्यांना हा अनुभव आला. गुन्ह्यांमधील इतर ९० टक्के लोकांना खऱ्या परिस्थितीची जाणीव नसते. तुरुंगात आल्यानंतर त्यांना त्यांच्या हातून झालेल्या चुकीची जाणीव होते. त्यामुळे अशा लोकांना गुन्ह्यांपासून परावृत्त करण्यासाठी एनजीओची मदत घेतली जाईल. त्यामुळे किमान २५ ते ३० टक्के लोकांमध्ये सुधारणा घडून येते. कॉर्पोरेट समूहही आता सामाजिक जाणिवेतून या क्षेत्रात मदत करीत आहेत. अशा लोकांशी संपर्क केला जाईल.वाहतूक व्यवस्था सुधारण्यासंदर्भात त्यांनी सांगितले की, कुठल्याही कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसांचा मानवीय चेहरासुद्धा असायला हवा. नियमांचे सक्तीने पालन व्हावे, परंतु त्याचसोबत लोकांना विनाकारण त्रासही होऊ नये, याचेही पालन होणे आवश्यक आहे. पोलिसांचे काम महसूल गोळा करणे नाही. यामुळे त्यांची प्रतिमा प्रभावित होते. वाहतूक व्यवस्था स्मार्ट सिटीप्रमाणे असायला हवी, असेही ते म्हणाले. डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, ते १० वर्षांनंतर नागपुरात परत आले आहेत. यादरम्यान शहरात मोठा बदल झाला आहे. आर्थिक आणि सायबर गुन्हे वाढले आहेत. स्ट्रीट क्राईमही वाढले आहे. पोलीस आणि प्रशासनावरील लोकांचा विश्वास कायम करणे, हीच त्यांची प्राथमिकता असेल. लोकांनी पोलिसांना आपला मित्र समजायला हवे, असेही ते म्हणाले. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त श्यामराव दिगावकर उपस्थित होते.