नागपूर - रामदास पेठमधील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये गुंडांच्या एका टोळक्याने पार्टीच्या नावाखाली सोमवारी पहाटेपर्यंत प्रचंड धुडगूस घातला. तरुणीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप करून एका गटाने एका तरुणावर काचेची बाटली फोडून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. टोळक्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव यश राजकुमार शर्मा (वय २५) असून तो खासगी इस्पितळात दाखल आहे.
यशचे मित्र साैरभ सुहास कुलकर्णी (वय ३२, रा. ओमकार नगर) तसेच राहुल निखाडे (रा, रामनगर चंद्रपूर) रविवारी रात्री हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये मुक्कामी थांबले होते. या हॉटेलमध्ये दुसरी एक बर्थ डे पार्टी सुरू होती. एक तरुणी तिच्या मित्रासोबत त्या पार्टीत सहभागी झाली होती. पहाटे ४.३० च्या सुमारास ती तरुणी अन् तिचा मित्र यश बसलेल्या सोफ्याजवळ आले. तरुणीच्या मित्राने त्याला सोफ्यावरून पाय दुसरीकडे ठेव, असे म्हटले. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला.
पोलिसांच्या कथनानुसार तरुणीसोबत यावेळी यशने लज्जास्पद वर्तन केले. झोंबाझोंबी, शिवीगाळ वाढली अन् तरुणीचा मित्र तसेच आरोपी राजा रंगुनवाला, सोहेल रंगुनवाला, झेन रंगुनवाला, राजा शरिफ, साहिल, ताैसिफ, फैजल, सैफ रंगुनवाला , यश गावंडे, विनय भांगे आणि त्यांचे साथीदार यश शर्मावर तुटून पडल्यासारखे झाले. दारूची काचेची बाटली फोडून आरोपींनी यशच्या डोक्यावर, हातावर तसेच जागोजागी वार केले. आरोपींनी यशवर चढवलेल्या खुनी हल्ल्यामुळे हॉटेलमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.
अनेक पाहुणे आपापली रूम उघडून बाहेर आले. यावेळी आरोपी प्रचंड हैदोस घालत होते. पहाटे ५.३० पर्यंत त्यांचा धुडगूस सुरू होता. कसाबसा जीव वाचवून यश आणि त्याचे मित्र सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथून जखमीला एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर जखमीशी जुळलेली मंडळीही मोठ्या संख्येत रुग्णालय आणि पोलीस ठाण्यात दाखल झाली. तेव्हा सीताबर्डी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी साैरभ कुलकर्णीच्या तक्रारीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.
प्रकरण दडपण्यासाठी आटोकाट प्रयत्न
तरुणीशी अतिप्रसंगाचा प्रयत्न अन् तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचे हे अतिशय गंभीर प्रकरण दडपण्यासाठी संबंधितांकडून आटोकाट प्रयत्न झाले. त्याचमुळे गुन्हा दाखल होण्यास विलंब झाला. गुन्हा दाखल झाला तरी पुढचे २४ तास याबाबत पोलिसांकडून माहिती उघड झाली नाही. दरम्यान, गंभीर गुन्हा दाखल झाल्याचे कळताच दुसऱ्या गटातील तरुणीही पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने यश शर्माने लज्जास्पद वर्तन करून मारण्याचा प्रयत्न केला तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी आरोपी यश शर्माविरुद्ध धमकी देऊन विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला.
हॉटेल व्यवस्थापनाकडून लपवाछपवी
हॉटेलमध्ये एवढी मोठी घटना घडूनही तत्काळ पोलिसांना कळविण्याची तसदी व्यवस्थापनाने घेतली नाही. सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनीस यांना या संबंधाने विचारणा केली असता हॉटेल प्रशासनाकडून पोलीस ठाणेच नाही तर नियंत्रण कक्षातही याबाबतची माहिती देण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अतिप्रसंग आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा झाकण्याचा हॉटेल प्रशासनाने प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने आम्ही व्यवस्थापनाकडेही चाैकशी करणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले.
----