लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोंदियातील काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. अग्रवाल हे तीनदा विधानसभा व दोनदा विधान परिषदेचे आमदार राहिले आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पूर्व विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.अग्रवाल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर सोमवारी सायंकाळी नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या समर्थकांसह भाजप प्रवेश केला. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम व वन राज्यमंत्री परिणय फुके यांच्यासह विविध आमदार व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. गोंदियाचे भाजप अध्यक्ष हेमंत पटले यांनी अग्रवाल यांचे भाजपमध्ये स्वागत केले. राजकारणात शक्ती नेहमी वाढत राहायला हवी. त्यामुळेच आपल्या परिवारासोबत बाहेरचे सक्षम लोकदेखील आले पाहिजेत. अजेय शक्ती झाली पाहिजे. परंतु बाहेरच्यांना आपले मानून सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे. जुना-नवीन परिवार असा वाद नको, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हा परिवर्तनाचा क्षण आहे. मुख्यमंत्र्यांनी सातत्याने दाखविलेला स्नेह व साधलेला संवाद यामुळे मी भाजपमध्ये आलो. मागील पाच वर्षांत त्यांच्या नेतृत्वात विकासच झाला आहे. मी केवळ विकासासाठीच भाजपमध्ये आलो आहे. मला ‘कलाकंद’ खायचे नाही, असे मत गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले.भविष्यात आणखी प्रवेश होतील : मुख्यमंत्रीयावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्रवाल यांच्या प्रवेशावर भाष्य केले. अग्रवाल यांचा प्रवेश झाला असला तरी अनेकांची भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे. तांत्रिक कारणांमुळे अडलेले हे प्रवेश भविष्यात होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. २०१४ मध्ये सुरुवातीच्या काळात सरकार काहीसे अस्थिर होते. त्यावेळीच गोपालदास अग्रवाल यांनी आम्हाला पाठिंबा देण्याची भूमिका मांडली होती. आम्ही त्यांना लोकलेखा समितीचे अध्यक्ष बनविले. या समितीच्या माध्यमातून तयार झालेले अहवाल स्फोटक होते व या माध्यमातून आघाडी शासनाच्या काळातील भ्रष्टाचार समोर आला. मागील पाच वर्षांपासून अग्रवाल शरीराने काँग्रेससोबत होते, परंतु मनाने आमच्यासोबतच होते, असे मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादन केले.
गोंदियातील काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल भाजपमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 9:11 PM
गोंदियातील काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश : पूर्व विदर्भात काँग्रेसला धक्का