- यांच्याकडे कोण लक्ष देणार? : प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था सातत्याने करीत आहेत मनधरणी
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना महामारीच्या विरोधात लसीकरण हे सर्वांत शक्तिशाली शस्त्र असतानाही, लसीकरणाबाबतची निगेटिव्ह पब्लिसिटी लसीकरण मोहिमेला बाधक ठरते आहे. याचे ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास, कायम भटकंतीवर असणाऱ्या गोपाळांच्या वस्त्या आहेत. येथे प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध स्वयंसेवी संस्थांनी आयोजित केलेल्या लसीकरण शिबिराला गोपाळ पाड्यावरील नागरिकांनी थेट नकार कळविला आहे. त्यांच्या निरागस कल्पना, भ्रामक शंकांपोटी ते लसीकरण नाही म्हणजे नाही, अशी भावना व्यक्त करीत आहेत.
कोरोनासंदर्भात लसीकरणाच्या प्रारंभापासूनच राजकीय विरोध, निघालेले फतवे आणि सोशल मीडियावर होत असलेला या शंकांचा प्रसार विकास आणि आधुनिक युगापासून बरेच लांब असलेल्या भटक्या जमातीच्या गोपाळ पाड्यांवरही झाला आहे. लसीकरणामुळे लागलीच मृत्यू होतो, नपुंसकता येते अशा भ्रामक अपप्रचारांनी ते ग्रासले आहेत. या पाड्यांवर गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, विविध संस्थांचे सदस्य जनजागरणासाठी सातत्याने पोहोचत आहेत. मात्र, त्याचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही. म्हणून लसीकरणाची विशेष व्यवस्था केली असतानाही हे पाडे लसीकरणापासून वंचित आहेत. कुही तालुक्यातील खेतापूर, ससेगाव या गावांच्या वेशीवर वसलेल्या गोपाळ पाड्यांची ही स्थिती आहे. आधुनिकतेच्या नावाखाली स्मार्टफोन्स सगळ्यांकडेच आहेत. मात्र, त्याच स्मार्टफोन्समधून होत असलेल्या अपप्रचाराला त्यांच्या निरागस भावना बळी पडत आहेत. प्रशासकीय कागदपत्रांचे महत्त्व माहीत असलेल्या या लोकांच्या असल्या स्थितीला दोषी कोण आणि यांच्याकडे कोण लक्ष देणार, हा प्रश्न आहे.
----------------
बॉक्स...
प्रशासकीय जाणिवा अजूनही कमकुवत
शहराच्या अवतीभवती, तालुक्यात व गावाच्या वेशीवर कसरती करतब करणारे, भीक मागणारे, शिकार करणारे, गाई-म्हशी-शेळ्या पाळणारे व मिळेल त्या रोजमजुरीवर जगणाऱ्या भटक्या लाेकांच्या वस्त्या आहेत. त्यांना पारधी बेडे, गोपाळ पाडे असे संबोधले जाते. या वस्त्या आजही शिक्षणापासून वंचित आहेत. कालांतराने आणि मतांचा गठ्ठा म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून त्यांचे मतदान, आधार, रेशनकार्ड तयार झाले. मात्र, म्हणावी तशी सुधारणा अजूनही झालेली नाही. काळाच्या ओघात आज या सगळ्यांच्या हाती स्मार्टफोन्स आली आणि घरोघरी टीव्हीही. मात्र, शासकीय-प्रशासकीय जाणिवा अजूनही त्यांच्या मजबूत झालेल्या नाहीत. म्हणून आजही हे बेडे, पाडे गैरसमजुतीवर जगताना आढळतात.
-------------
कोरोना होणार नसेल तर लस घेऊ
लसीकरणाबाबत अनेक वाईट गोष्टी कानावर येत असल्याने आम्ही घाबरलो आहोत. अधिकारी येथे उपस्थित राहत असतील आणि गॅरंटी देत असतील तर लस घेण्यास हरकत नाही.
रवी जयराम जाधव ()
----------
आमची भीती दूर करा
लसीकरणाबाबत आम्ही घाबरलो आहोत. त्यामुळे, प्रशासनाने येथे उपस्थित राहून आमची भीती दूर करावी. हमी मिळाली तर लसीकरणास विरोध नाही.
संजय जाधव ()
-----------------
मी लस घेतली
मी मागच्याच महिन्यात लस घेतली. मी एकदम ठीक आहे. पाड्यावर लस घेण्याचे आवाहन केले. काही लोक तयार आहेत. मात्र, इतरांमुळे तेही कचरत आहेत.
- मोतीराम वाघाडे ()
.....................