नागपूर : माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, त्यांचे पुत्र आमदार विप्लव बाजोरिया आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत करून अकोला येथील ८० कोटी रुपये किमतीची १.७५ एकर जमीन हडपली, असा आरोप एका जनहित याचिकेत करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा आरोप गंभीरतेने घेऊन राज्य सरकारला या जमिनीचा १८९६ मधील मूळ लीज करार मागितला आहे. त्यासाठी सरकारला २२ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अकोला येथील रहिवासी कमल सुरेखा यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तिद्वय सुनील शुक्रे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. वादग्रस्त जमीन वॉर्ड-३६ येथे आहे. १८९६ मध्ये ब्रिटिश सरकारने ही जमीन क्रीडा उपक्रमांसाठी मित्र समाज क्लबला लीजवर दिली होती, असे सांगितले जात आहे. परंतु, वर्तमान कायद्यानुसार अनोंदणीकृत संस्थेला सरकारी जमीन लीजवर दिली जाऊ शकत नाही. ही बाब पाहता मित्र समाज क्लबची २ जून २०२० रोजी नोंदणी करण्यात आली आहे.
या परिस्थितीत नोंदणीकृत मित्र समाज क्लबला जमीन लीजवर द्यायची असल्यास नव्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. याशिवाय या जमिनीच्या लीज कराराची मुदत संपली आहे. त्यामुळे जमीन सरकारला परत होणे आवश्यक आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या क्लबच्या व्यवस्थापनामध्ये माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नातेवाईकांचा मोठ्या संख्येत समावेश आहे. त्यांनी सर्वांनी मिळून ही जमीन हडपली, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. तुषार मंडलेकर यांनी कामकाज पाहिले.