लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्ली मार्गावर गोरखपूर-यशवंतपूर एक्सप्रेसचे चाक तुटल्याची घटना रविवारी सकाळी ८.१५ वाजताच्या दरम्यान घडली. ही गाडी नागपूरकडे येत होती. काटोलजवळ सोनखांब ते कोहली स्टेशनच्या मध्ये ही गंभीर घटना घडली. गाडीच्या ए-२ कोचमधील एका रेल्वे कर्मचाऱ्याला ही बाब लक्षात आल्याने त्याने चेन पुलिंग करून ताबडतोब गाडी थांबविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र यामुळे नागपूरकडे येणाऱ्या सहा गाड्यांना विलंब झाला.काटोलजवळ सोनखांब व कोहली स्टेशनच्या मध्ये रविवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीकडून येणाऱ्या ट्रेन क्रमांक १५०१५ गोरखपूर-यशवंतपूर एक्सप्रेस ही गाडी नागपूरकडे येत होती. सकाळी ८.१५ वाजताच्या दरम्यान काटोलजवळ गाडीच्या ए-२ कोचच्या चाकाचा तुकडा पडला. त्यामुळे एका मोठा झटका बसला. या कोचमध्ये एक रेल्वेचा कर्मचारीही प्रवास करीत होता. त्यांना काहीतरी गंभीर प्रकार लक्षात आला. त्यांनी अलार्म चेन पुलिंग करून ताबडतोब गाडी थांबविली. खाली उतरुन पाहिल्यानंतर कोचचा चाक खंडीत झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तगेच कन्ट्रोल रुमला फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी अॅक्सीडंट रिलीफ ट्रेन पोहचली व कोच वेगळा करण्याचे काम सुरू करण्यात आले. दुपारी १ वाजतापर्यंत हे काम सुरू होते. एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. मात्र या अपघातामुळे इटारसीकडून नागपूरकडे येणाऱ्या अनेक गाड्या ठप्प पडल्या. यामध्ये १६०९४ लखनउ एक्सप्रेस, २७९२ सिकंदराबाद एक्सप्रेस, २२६९२ राजधानी एक्सप्रेस, १२७२४ तेलंगना एक्सप्रेस, १२४१० गोंडवाना एक्सप्रेस आणि एक अन्य गाडी थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.