लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणी उद्यान उद्घाटनासाठी आणि नामकरणासाठी सज्ज झाले असून, ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणी उद्यान‘ असा फलकही झळकला आहे. या नामकरणाला असलेला विरोध लक्षात घेता, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिसांची तुकडी आतापासूनच प्राणी उद्यानाच्या प्रवेशद्वारावर तैनात झाली आहे.
२६ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रस्तावित उद्यानाचे नामकरण होणार असून, इंडियन सफारीचेही उद्घाटन होणार आहे. इंडियन सफारीसाठी ११५ हेक्टर परिसरात उभारलेल्या चार एन्क्लोजरमध्ये प्राणी सोडण्यात आले असून, तेथील काम अंतिम टप्प्यात आले आहे. दुपारी ३ वाजता काटोल मार्गावरील या प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनमंत्री संजय राठोड असतील. केंद्रीय रस्ते परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
...
इंडियन सफारीची सज्जता
उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत एफडीसीएमचे विभागीय संचालक एन. वासुदेवन, महाव्यवस्थापक ऋषीकेश रंजन, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर आदींच्या उपस्थीतीत झालेल्या पत्रकार परिषदेत येथील तयारीची माहिती देण्यात आली. सिंगापूरच्या धर्तीवर उभारणी होत असलेल्या या प्रकल्पातील दुसऱ्या फेजचे काम पूर्ण झाले असून आफ्रिकन सफारीसाठी मास्टर प्लॅन तयार आहे. नाईट सफारीही वैशिष्ठ्यपूर्ण राहणार असून त्याचेही काम पुढच्या टप्प्यात होणार असल्याची माहिती एन. वासुदेवन यांनी दिली. एस्सेल कंपनीसोबत येथील विकासाचा करार झाला होता. कायदेशिर दृष्ट्या हा करार मोडित निघाला नसून एस्सेल वर्ड अद्यापही भागिदार आहे. मात्र काही अडचणी आल्यामुळे सरकार दुसरा दुसरा भागीदार शोधणार आहे. ४५० कोटींच्या या प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकार देणार असून २५० कोटींचा निधी भागीदार कंपनी देईल, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान स्पष्ट केले. यावेळी एफडीसीएमच्या मुख्य महाव्यवस्थापक (औषधी व्यवस्थापन) मीरा अय्यर, मुख्य महाव्यवस्थापक श्रीनिवास राव, गोरेवाडाचे विभागीय व्यवस्थापक प्रमोद पंचभाई प्रामुख्याने उपस्थित होते.
...
पोलिसांचा ताफा सज्ज
२६ जानेवारीला होणाऱ्या नामकरणाला आणि उद्घाटनाला सामाजिक संघटनाननी विरोध दर्शविला असला तरी सरकार नामकरणावर ठाम आहे. रिववारी दुपारीच येथील प्रवेशद्वारावर प्रस्तावित नामफलक उभारण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान होणारा विरोध टाळण्यासाठी आणि बंदोबस्तासाठी पोलिसांची शस्त्रसज्ज तुकडी तैनात करण्यात आली आहे. रविवारी दुपारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त विनिता साहू यांनी प्रकल्पाला भेट देऊन पहाणी केली आणि सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेतला. दुपारनंतर पोलिसांचा ताफा वाढविण्यात आला.
...