जोराच्या पावसामुळे तारांबळ : बेझनबाग परिसरातील घरात पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने रविवारी गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाला. यामुळे तलावाच्या चारपैकी एक गेट उघडण्यात आले. दुपारच्या सुमारास नागपूर शहर व परिसरात जोराचा पाऊस झाला. यामुळे शहरातील चौक व रस्त्यावर जागोजागी पाणी साचले होते. अनेक ठिकाणी घरातही पाणी शिरले होते.
बेझनबाग परिसरातील रस्त्यावर पाणी साचले होते. हरिकिशन पब्लिक स्कूल परिसरात दोन ते तीन फूट पाणी साचले होते. शाळेच्या बाजूला वाहणाऱ्या नाल्याचे पाणी रस्त्यावर आले होते. आजुबाजूच्या घरातही पाणी साचले होते. सिवरेजचे पाणी घरात तुंबल्याने नागरिक त्रस्त झाले. मोतीबाग रेल्वे कॉलनीतील घरातही पाणी शिरले. शिव मंदिराच्या गर्भगृहात पाणी भरले होते.
नरेंद्र नगर पूल, लोहा पुलाखाली पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. मेयो रुग्णालयासमोरील मार्गावर पाणी साचले होते. संत्रा मार्केट परिसरात पाणी तुंबले होते. शंकरनगर मेट्रो स्टेशन, तिरपुडे कॉलेज परिसर, मेडिकल चौक, रहाटे नगर, बेलतरोडी, पिपळा, चक्रपाणी नगर, भरतनगर, कळमणा, हुडको कॉलनी परिसरातील रस्त्यावर पाणी साचले होते. रामदासपेठ, धरमपेठ, शंकर नगर भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने काही वेळ वाहन चालकांची तारांबळ उडाली होती. शहरातील इतर भागातही अशीच परिस्थिती होती.