नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात नागरिकांच्या मनोरंजनासाठी सुंदर आणि आकर्षक जंगल सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, परंतु त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे.
या संदर्भात विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशच्या (व्हीटीए) प्रतिनिधी मंडळाने महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक श्रीनिवास राव यांना निवेदन दिले. व्हीटीएचे उपाध्यक्ष हेमंत त्रिवेदी यांनी राव यांची भेट घेतली. प्राणिसंग्रहालयात मर्यादित सुविधा असल्याने, जंगल सफारी केवळ ४५ मिनिटांत पूर्ण होते. त्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय नाव सार्थक ठरत नाही. त्यामुळे नागरिकांसाठी नाइट सफारी, आफ्रिकन सफारी, बायोपार्क व बर्ड पार्क यांसारख्या सुविधा सुरू कराव्यात. व्हीटीएचे सचिव तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, जंगल सफारीची योजना चांगली आहे, पण एवढ्या मोठ्या परिसरात प्राण्यांच्या संख्येत वाढ व्हावी, इंडियन सफारीचे मुख्य आकर्षण वाघ आणि बिबट असते, पण पर्यटकांना पाहण्याविना परतावे लागते. त्याचे स्थान व पत्ता लावून बस चालकांना सूचना दिल्यास पर्यटकांना पाहता येईल. व्हीटीएने माहितीचे साइन बोर्ड, लहान मुलांसाठी छोटा बगीचा, ऑनलाइन बुकिंगनंतर रांगेत लागण्याऐवजी प्रक्रिया डिजिटल करणे, पर्यटकांसाठी शेड, बसमध्ये व्हीआयपी संस्कृती बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत.
राव यांनी व्हीटीएच्या सूचना ऐकून त्यांनी तातडीने सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. व्हीटीएच्या प्रतिनिधी मंडळात कोषाध्यक्ष पवन के. चोपडा आणि सहसचिव अमरजीत सिंग चावला उपस्थित होते.