लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन दशकांहून अधिक काळ लोटूनदेखील गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील भूसंपादन, पुनर्वसन इत्यादी कामे शिल्लक आहेत. मी केंद्रीय जलसंधारण व गंगा पुनर्वसन मंत्री असताना स्वत: पुढाकार घेऊन केंद्र शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला व या प्रकल्पाचे काम वेगाने व्हावे असा प्रयत्न मी केला. मात्र प्रशासकीय उदासीनता आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे प्रकल्पाची कामे रेंगाळत आहेत, असा आरोपच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी लावला आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रकल्पाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
विदर्भातील शेतकऱ्यांचे जीवन बदलण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. बुडित क्षेत्रासाठी करावयाच्या सुमारे दीडशे हेक्टर भूसंपादनासह एकूण ४९५ हेक्टर भूसंपादन प्रलंबित आहे. अनेक कामे रेंगाळत आहेत. अशा प्रकारची हयगय आता खपवून घेतली जाणार नाही. एकाच कामाच्या निविदा वारंवार रद्द करणे व काढणे हे प्रकार बंद झाले पाहिजे, असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.
या प्रकल्पाच्या प्रगतीत येत्या १५ दिवसात जलशक्ती मंत्र्यांसोबत दिल्लीत बैठक होणार आहे. केंद्र आणि महाराष्ट्रातील संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात येईल. कामात निष्काळजीपणा आणि हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची शिफारस आपण करणार आहोत, असेदेखील गडकरी यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर-तुकाराम पालखी महामार्गांच्या सुशोभिकरणासाठी सूचना पाठवा
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या महान विभूतींच्या नावाने महाराष्ट्रात निर्माणाधीन असलेल्या दोन पालखी महामार्गांचा सर्वंकष विकास आणि सुशोभिकरण यासाठी सूचना पाठविण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.