- अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद
नागपूर : भविष्यातील संकटाला सामोरे जाण्यासाठी राज्यातील शासकीय, अशासकीय आणि खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन प्लान्ट लावणे बंधनकारक करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेने केंद्र आणि राज्य शासनाकडे केली आहे.
परिषदेचे राष्ट्रीय महासचिव देवेंद्र तिवारी म्हणाले, कोरोना महामारीत सर्वच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा झाला आहे. जर त्यांच्या जागेत लहानमोठे ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट असते तर ऑक्सिजनचा तुटवडा होऊन रुग्ण दगावले नसते. त्यामुळे स्थानिक, राज्य आणि देशपातळीवरील सर्वच जुन्या आणि नवीन रुग्णालयांना आपल्या जागेत ऑक्सिजन प्लान्ट लावण्याचे निर्देश द्यावेत आणि त्याकरिता संसदेत कायदा पारित करावा. याशिवाय पुढे रुग्णालयांना परवानगी देताना नियमात ऑक्सिजन प्लान्ट बंधनकारक करावे. प्लान्ट असल्याशिवाय रुग्णालयांना परवानगी देऊ नये. याशिवाय ज्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लान्टकरिता जागा नसेल त्या रुग्णालयांना ऑक्सिजनची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश द्यावेत. मुबलक ऑक्सिजन उपलब्धतेवर नागरिकांमध्ये जागरूकता आणण्याची गरज आहे. वृक्षारोपण करताना वस्त्यांमध्ये आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूला कडुलिंब, पिंपळ आणि वडाची झाडे लावावीत.