लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची ६० टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. पदभरतीला मंजुरी मिळावी, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर प्रमुख अग्निशामक विमोचक, अग्निशामक विमोचक व मुख्य मेकॅनिक कम ड्रायव्हर ही पदे भरण्याला व पदोन्नतीला शासनाने मंजुरी दिली आहे.
पदभरतीसाठी अग्निशमन समितीने ठराव मंजूर करून मनपा सभागृहाला पाठविला होता. सभागृहाच्या मंजुरीनंतर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यावर आता शासनाच्या नगरविकास विभागाच्या १८ मार्च, २०२१ च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या सहाय्याने तयार करण्यात आले होते. आता या प्रस्तावाला राज्य शासनाने स्वीकृती प्रदान केली आहे.