लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात गेल्या नऊ वर्षांपासून प्राध्यापकांची रिक्त पदे भरलीच जात नसल्याने पदव्युत्तर जागेला ग्रहण लागले आहे. महाविद्यालयाला ‘पीजी’च्या ६० जागेला मान्यता असताना रिक्त पदांमुळे ५४ जागाच भरल्या जात आहेत. दरवर्षी सहा जागांचे नुकसान होत आहे. धक्कादायक म्हणजे, महाविद्यालयाचे चार विभाग हे ‘पीजी’विना आहेत. विदर्भातील विद्यार्थ्यांना फटका बसत असतानाही शासनाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे.शासकीय आयुर्वेद महाविद्यालयामध्ये शल्य, शालाक्य, निदान चिकित्सा, काय चिकित्सा, शारीरिक क्रिया, शरीररचना, संहितासिद्धांत, अगततंत्र, रसशास्त्र, स्वस्थवृत्त, पंचकर्म, स्त्रीरोग, द्रव्यगुण व बालरोग असे एकूण १४ विभाग आहेत. या विभागानुसार ‘पीजी’च्या २१ जागांवरून ६० करण्यात आल्या. परंतु पंचकर्म, स्त्रीरोग, द्रव्यगुण व बालरोग या चार महत्त्वाच्या विभागात प्राध्यापकांची पदे २००७ पासून भरलीच नाहीत. यामुळे पीजीच्या ६० पैकी ५४ जागाच भरल्या जात आहेत. चार विभागांमध्ये वरिष्ठ डॉक्टर नसल्यामुळे रुग्णसेवाही प्रभावित होत आहे. एकीकडे अनेक प्राध्यापक निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना शासन पदभरती करीत नसल्याने भविष्यात आणखी पीजीच्या जागा कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.२६० ऐवजी १८० खाटा‘भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदे’च्या निकषानुसार आयुर्वेद रुग्णालयात कमीतकमी २६० खाटा असायला हव्यात. मात्र एकाच इमारतीत रुग्णालय असल्याने खाटांची क्षमता केवळ ११० आहेत. रुग्णांची संख्या पाहता रुग्णालय प्रशासनाने ७० खाटा वाढवून १८० केल्या आहेत. नव्या पाच मजली रुग्णालयाच्या इमारतीची निर्मिती अद्यापही रखडली असल्याने वाढीव खाटाही अडचणीत आल्या आहेत.पदे भरल्यास विद्यार्थ्यांना फायदाचरिक्त पदे असल्याने निकषानुसार पीजीच्या ६० जागा भरता येत नाही. पदभरतीसंदर्भात शासनाकडे पाठपुरवा केला जात आहे. संपूर्ण पदे भरल्यास याचा फायदा रुग्णांनाही होईल व विद्यार्थ्यांनाही.डॉ. गणेश मुक्कावारअधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय