लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य नागपुरातील टिमकी येथे सरकारी धान्याच्या काळाबाजार प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा विभागाने संशयास्पद भूमिका घेतल्यामुळे खळबळ माजली आहे. विभागाच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी भगवानदास कल्याणीविरुद्ध केवळ चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अशा परिस्थितीत काळाबाजार करणाऱ्या टोळीचा भंडाफोड होऊ शकत नाही.बुधवारी सकाळी टिमकीमधील नागरिकांनी कुख्यात विनोद कल्याणीचे वडील भगवानदासला रेशन दुकानातील धान्य घेऊन जाताना पकडले होते. नागरिकांनी त्याला मारहाण केली होती. दरम्यान, विनोद तेथे पोहोचला. पोलिसांनी विनोद, भगवानदास व रेशन दुकानाचे संचालक खोब्रागडे यांना विचारपूस केली. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारी धान्याच्या काळाबाजाराचा प्रकार दिसून आल्यामुळे पोलिसांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्या अधिकाऱ्यांनी तिघांनाही विचारपूस केली. रेशन दुकान पुरे नामक व्यक्तीचे आहे. त्याने ते दुकान खोब्रागडेला चालविण्यासाठी दिले आहे. खोब्रागडेच्या बयानानुसार, भगवानदास कल्याणी त्याच्या दुकानात काम करतो. तो कुणालाही न सांगता चावी घेऊन गेला व दुकानातील धान्य चोरत होता. अन्न व नागरी पुरवठा विभागाने खोब्रागडेच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला. त्या आधारावर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला.या प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा विभागाची भूमिका संशयास्पद दिसून येत आहे. विनोद कल्याणीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वडिलाने खोब्रागडेच्या नकळत दुकानाची चावी घेतल्याची गोष्ट सर्वांना खोटी वाटत आहे. लॉकडाऊनमध्ये रेशन दुकानांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. टिमकी येथील नागरिक रेशनकरिता अनेक दिवसापासून खोब्रागडेच्या दुकानाच्या फेऱ्या मारत होते. त्यांना क ल्याणी सरकारी धान्याचा काळाबाजार करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी एक दिवसापूर्वी परिसरातील किराणा दुकानदाराला रेशनची साखर विकण्यावरून फटकारले होते. त्यानंतर त्यांनी कल्याणीला रंगेहात पकडले. कल्याणीने एका बचत गटाच्या प्रमुखाला सरकारी धान्य विकल्याची सार्वजनिक चर्चा आहे. त्याला वाचविण्यामध्ये एका स्थानिक नेत्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हे प्रकरण मिटविण्यासाठी तो नेता पोलीस ठाण्यात जाऊन नागरिकांवर दबाव टाकत होता. पोलिसांनी फटकारल्यानंतर तो आल्यापावली परत गेला होता. तो नेता कल्याणीने हेराफेरी करून कमावलेल्या संपत्तीमध्ये भागीदार आहे. त्यामुळे तो नेहमीच कल्याणीला वाचविण्यासाठी येतो. या प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
महिला बचत गटाद्वारे संचालित दुकान रद्द
रेशन दुकानांमधील धान्याचे दर स्वस्त आणि निर्धारित असतात. परंतु सदर येथील एका रेशन दुकानात लोकांच्या मजबुरीचा फायदा उचलत रेशनचे धान्य लोकांना अधिक किमतीवर विकले जात होते. चौकशीत ही बाब स्पष्ट होताच दीक्षा स्वयंसहाय्यता महिला बचत गटाद्वारे संचालित या दुकानाला रद्द करीत याचे संचालन दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सदर येथील उपरोक्त रेशन दुकानाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. या आधारावरच विभागातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. विभागात एफडीओ, दोन इन्स्पेक्टर आणि एक क्लर्क यांचे पथक सातत्याने रेशन दुकानांवर नजर ठेवून आहे. झोन स्तरावर निरीक्षकही दुकानांवर लक्ष ठेवून आहेत. विभागाकडे सर्वाधिक तक्रारी केशरी रेशनकार्डवाल्यांच्या येत आहे, ते सर्वांना समान धान्य वितरणाची मागणी करीत आहेत. याशिवाय यांच्याकडे कार्ड नाही ते कार्ड बनवून देण्याची मागणी करीत आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी-२ अनिल सवाई यांनी नागरिकांना शांती व संयम ठेवण्याची विनंती करीत सर्व कार्डधारकांना धान्य मिळेल असे सांगितले. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांच्यासाठीसुद्धा लवकरच तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.नवीन कार्ड बनवण्यासाठी होणार व्यवस्थामोठ्या संख्येने असे लोक आहेत, ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. विभागीय सूत्रानुसार पुढच्या आठवड्यात अशा लोकांचे कार्ड बनवण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. वस्त्यांमधील रेशन दुकानांमध्ये कार्ड बनवण्याची व्यवस्था होऊ शकते, अशीही चर्चा आहे.