लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांनी राष्ट्रनिर्माण आणि विकासाच्या मुद्यावरच लोकसभेची निवडणूक लढविली होती आणि जनतेनेही त्यांनी सत्ता सोपविली. मात्र गेल्या चार वर्षात दिलेले एकही आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. या प्रश्नांना नियोजितपणे बाजूला ठेवून धार्मिक ध्रुवीकरणाद्वारे हिंदू राष्ट्र निर्मितीचा आणि भारताचे हिंदू पाकिस्तान करण्याचा उघड कट रचला गेला आहे. यासाठी सत्तेच्या दबावातून प्रसार माध्यमे आणि न्यायव्यवस्थेतही ढवळाढवळ केली जात आहे. लोकशाही मार्गाने सत्तेत येऊनही संविधानाची चौकट मोडून लोकशाही संस्थांचे खच्चीकरण करण्याची प्रक्रिया आरएसएसच्या प्रभावाखाली असलेल्या सरकारने चालविली असल्याची घणाघाती टीका पत्रकार निखिल वागळे यांनी सोमवारी येथे केली.बाळासाहेब सरोदे अमृत महोत्सव समितीच्यावतीने सर्वोदय आश्रम येथे सोमवारी ‘राष्ट्रनिर्माण आणि धर्मउत्थानात लोकशाहीचा गळा दाबला जातोय का?’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर बाळासाहेब सरोदे, मंगला सरोदे, अॅड. असीम सरोदे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना निखिल वागळे यांनी संघ आणि भाजपा सरकारवर थेट हल्ला केला. लोकशाही मार्गाने सत्तापरिवर्तन होते, यात काही गैर नाही. मात्र गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. बेरोजगारीच्या समस्येमुळे युवक नाराज आहेत. मात्र हे मुद्दे सोडून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटला जात आहे. यासाठी वेगवेगळ्या संघटनांचे मुखवटे लावून उन्माद केला जात आहे. मात्र यामागे संघ ही एकच मातृसंघटना असल्याचा आरोप त्यांनी केला. २०१९ च्या निवडणुका राम मंदिराच्या अजेंड्यावरच लढविल्या जाणार आहेत. निवडणुका जवळ आल्या की धार्मिक ध्रुवीकरण करून दंगली घडविल्या जातील व सत्ता मिळविली जाईल, असे भाकीत त्यांनी केले.तुमची राष्ट्रनिर्माणाची संकल्पना काय आहे ? देशात पेशवेशाही हवी की शिवशाही, गांधींचे विचार-आंबेडकरांचे संविधान हवे की गुरू गोळवलकर हे सरकारने आधी जाहीर करावे असे आव्हान त्यांनी दिले. जर्मनीचा हुकूमशाहा हिटलरने लोकांना राष्ट्रनिर्माणाचे आमिष दाखवून सत्ता मिळविली. पुढचा इतिहास सर्वांना माहिती असल्याचे सांगत त्यांनी हिटलर आणि पंतप्रधान मोदी यांची कार्यपद्धती समान असल्याची टीका केली. देशातील लोकशाही आज धोक्यात आली आहे. देशात अघोषित आणीबाणी लागू झाल्याचा आरोप वागळे यांनी केला.शेतकरी आंदोलनावरून गोंधळशेतकºयांच्या मोर्चाला माओवाद्यांचे आंदोलन संबोधणाऱ्या खासदार पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा निखिल वागळे त्यांच्या शैलीत समाचार घेत होते. त्यावर सभागृहातील एका व्यक्तीने मोर्चेकऱ्यांच्या हाती लाल झेंडे का होते, असा आक्षेप नोंदविला. तोच वागळेही संतापले. सभागृहातील अन्य लोकांनी त्या व्यक्तीला बाहेर हुसकाविण्याचा स्वर आळवला. यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. सभागृह शांत होताच ‘लाल झेंडा क्रांतीचे प्रतीक आणि कामगारांचा ध्वज आहे. ही साधी अक्कल नाही, ते राष्ट्रनिर्माण काय करणार’, असा टोला त्यांनी लगावला.सरकारची वर्तमान कार्यपद्धती पाहता संविधान आणि लोकशाही संपुष्टात आणली जाईल आणि सार्वजनिक निवडणुका घेणेही बंद केले जाण्याची शक्यता आहे. पुढील काही चार ते पाच सार्वत्रिक निवडणुका शेवटच्या ठरतील, असा धोका त्यांनी यावेळी व्यक्त केला.बाळासाहेब सरोदे म्हणाले की, गांधीशिवाय तराणोपाय नाही या धारणेवरच जीवनप्रवास सुरू आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड म्हणजे सर्वोदय होय. अध्यात्म म्हणजे पोथी वाचून पोपटपंची करणे नव्हे तर ती जीवन जगण्याची कला आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यापुढेही वानप्रस्थाश्रम नाही तर जनप्रस्थाश्रमात राहूनच कार्यरत राहणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक अॅड. असीम सरोदे यांनी तर संचालन डॉ. रवींद्र भुसारी यांनी केले. संदेश सिंगलकर यांनी आभार मानले.