समाजकल्याण विभागाचे संकेत :
प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात शासनाकडून शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात येईल. या दृष्टीने तसेच महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असल्यामुळे या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या नागपूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म भरणे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील शासकीय वसतिगृहे सुरू होण्याची शक्यता बळावली आहे.
प्रवेश फॉर्म भरण्याची कोणतीही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली नाही. शासनाकडून वसतिगृह सुरू करण्याच्या सूचना प्राप्त होईल, तेव्हा गुणवत्तेच्या आधारावर निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या ठिकाणी फक्त विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने गुगल फॉर्मची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तरी या बाबतीतच्या प्रवेश सूचना त्यांनी एचटीटीपी कोलन हॅश गुणवंत होस्टेल डॅश जीओव्हीटी डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या ब्लॉगवर किंवा ऑफलाईन फॉर्म शासकीय वसतिगृहामध्ये व सहायक आयुक्त, समाज कल्याण नागपूर या कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तेव्हा प्रवेश इच्छुकांनी अर्ज भरावे, असे समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी कळविले आहे.