नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हॉटेल आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायातील मध्यभारतातील बडे प्रस्थ म्हणून परिचित असलेले तुली ईम्पेरियलचे मालक मोहब्बतसिंग तुली यांच्या प्रभावात सरकारी यंत्रणा आहे का? असा प्रश्न उपिस्थत झाला आहे. १ जानेवारीच्या पहाटे पोलिसांनी हॉटेल तुली इम्पेरियलमध्ये दणकेबाज कारवाई केली. मात्र, त्याला पूरक अन्य विभागांकडून कारवाई करण्यासाठी चालढकल केली जात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. त्यामुळे हा प्रश्न चर्चेला आला आहे.
थर्टी फर्स्टच्या पार्टीच्या नावाखाली हॉटेल तुली ईम्पेरियलमध्ये जोरदार पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेच्या पथकाने १ जानेवारीच्या पहाटे २.३० च्या सुमारास या हॉटेलमध्ये धडक दिली. यावेळी तेथे कायद्याचे उल्लंघन करून कसलीही परवानगी न घेता पार्टीच्या नावाखाली धांगडधिंगा सुरू असल्याचे पोलिसांना दिसले. कोरोनाचे संक्रमण असताना ३०० ते ४०० जणांची पार्टी आयोजित करण्यात आली होती. अवैधपणे रुफ टॉपवर ही पार्टी सुरू होती. सरकारची बंदी असतानासुद्धा ग्राहकांना हुक्का दिला जात होता. तोकड्या कपड्यातील तरुणींसह ६७ जण डान्सच्या नावाखाली आक्षेपार्ह्य अंगविक्षेप करीत होते. परमिटरूमच्या बाहेर दारू वाटली जात होती. पोलिसांनी या सर्व गैरप्रकाराचे व्हिडीओ फुटेज जप्त केले. पोलिसांनी या प्रकरणात हॉटेलमालक मोहब्बतसिंग तुली, कुक्कू ऊर्फ बछिंदरसिंग तुली आणि हॉटेलचा सहायक व्यवस्थापक संजय पेंडसे तसेच नशेत टून्न असलेल्या ६७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या सर्व गैरप्रकाराची जंत्री तयार करून पोलिसांनी एक्साइज, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाकडे पाठविला. १९ दिवस होऊनही त्या संबंधाने अद्याप कुणाकडूनही हालचाल झालेली नाही. जिल्हा प्रशासनाकडून अद्याप हॉटेलच्या बारचा परवाना रद्द झाला नाही. एक्साइज विभागाने तेवढा हॉटेल प्रशासनाला ‘शो कॉज नोटीस’ दिला आहे. त्या ६७ जणांच्या रक्तात कोणत्या अमली पदार्थाचे कंटेन्ट होते, त्याचा अहवाल डॉक्टरांकडून अद्याप आला नाही. रूफ टॉप वैध की अवैध त्या संबंधाने महापालिकेकडूनही कोणतीच कारवाई अथवा अहवाल मिळालेला नाही. पोलिसांनी भक्कम पुराव्यानिशी संबंधित विभागांना अहवाल पाठविला मात्र त्यांच्याकडून कारवाईचे पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे हे विभाग तुली यांच्या प्रभावात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
----
आमची कारवाई भक्कम : राजमाने
आम्ही आमची कारवाई भक्कमपणे केली आहे. प्रतिबंधित हुक्का, अवैध दारू विक्री, रुफ टॉपवरची अवैध पार्टी व्हिडीओत आली आहे. अन्य विभागांचे अहवाल मिळाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाईल. या प्रकरणात आरोपींना निश्चित शिक्षा होईल, असा विश्वास या संबंधाने माहिती देताना गुन्हे शाखेचे उपायुक्त राजमाने यांनी व्यक्त केला.