लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचे संकट पूर्णत: टळलेले नसतानादेखील काही राज्यामध्ये शाळा सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काय निर्णय घेतला जातो, याकडे पालक-विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र यासंदर्भात राज्य सरकार कुठलीही घाई करणार नाही, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. गुरुवारी नागपुरात आले असता प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. (The government is in no hurry to open the school)
केरळनंतर महाराष्ट्रातदेखील काही जिल्ह्यांमध्ये बाधितांची संख्या वाढत आहे. राज्यात जेव्हा शाळा सुरू करण्याबाबत विचार होतो, तेव्हा संसर्ग वाढायला लागतो. शिक्षण महत्त्वाचे आहे, मात्र आरोग्याची काळजी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. येत्या दोन दिवसात सरकार याबाबतीत ठोस निर्णय घेईल, असे कडू यांनी सांगितले.
त्यांनी विधान परिषदेत आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या दवाबात राज्यपाल काम करीत आहेत. राज्य शासनाने राज्यपालांना १२ नावे पाठविली आहेत. जर नियमानुसार नाव पाठविण्यात आले नाही, असे वाटत असेल तर राज्यपालांनी यादी नाकारावी. मात्र भाजपला सत्तेची स्वप्न अजूनही पडत आहेत व त्यांच्या कार्यकर्त्यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येईल, असे त्यांना वाटत आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यासंदर्भात राज्यपालांना विचारणा करीत आहेत, परंतु ते कुठलाही निर्णय घेत नाहीत. याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी कडू यांनी केली.
राज्यात जो कुणी भाजपविरोधात बोलत आहे, त्याला ईडीचा सामना करावा लागत आहे. भाजपने ईडीला राजकीय शस्त्रच बनविले आहे. भाजपच्या नेत्यांवरदेखील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, मात्र त्यांची चौकशी होत नाही, असेदेखील कडू म्हणाले.