लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा उत्साह अजूनही संपला नसल्याचे दिसते आहे. पाच दिवसांच्या मनसोक्त सुट्या मिळाल्यानंतरही सोमवारी कामकाजाच्या पहिल्या दिवशी शहरातील अनेक शासकीय कार्यालये ओसाड दिसून आली. त्याचा फटका मात्र कामकाजासाठी सरकारी कार्यालयात चकरा मारणाऱ्यांना बसताना दिसला.दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतरही आज सोमवारी शहरातील विविध शासकीय कार्यालयातील खुर्च्या कर्मचाऱ्यांअभावी रिकाम्या दिसून येत होत्या. दिवाळीच्या बुधवारपासून शुक्रवारपर्यंत शासकीय कार्यालयांना सुट्या होत्या. त्यातच महिन्याचा दुसरा शनिवार व रविवार आल्यामुळे सलग पाच दिवसांच्या सुट्या कर्मचाऱ्यांना मिळाल्या. सुट्या संपल्यानंतर आज सोमवारी कार्यालये उघडतील, अशी अपेक्षा नागरिकांसह शेतकऱ्यांना होती. मात्र सोमवारी शासकीय कार्यालये उघडूनही कार्यालयातील संबंधित काही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्याच दिसून आल्या. शहरातील जिल्हा परिषद, विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, भूजल सर्व्हेक्षण, कृषी विभाग, प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालये आदीमध्ये आज अघोषित सुटीप्रमाणेच वातावरण दिसून येत होते. गेल्या आठवड्यात दिवाळीच्या सलग पाच दिवस सुट्या येत असल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारपासूनच सुटी असल्यासारखे वावरण्यास सुरुवात केली होती. कसेबसे पाच दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी कार्यालये उघडलीत, मात्र अनेक कर्मचारी हे रजेवर होते किंवा रजेवर असल्याप्रमाणे परिस्थिती शासकीय कार्यालयांमध्ये होती. कार्यालयातील कर्मचाºयांची कमतरता आणि पाच दिवसात आलेली मरगळ यामुळे आज अनेक कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या गप्पांचा फड रंगला होता. विशेष म्हणजे संबंधित अधिकारीसुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत होते.
सुट्या संपल्यानंतरही सरकारी कार्यालये ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:11 AM
शासकीय कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा उत्साह अजूनही संपला नसल्याचे दिसते आहे. पाच दिवसांच्या मनसोक्त सुट्या मिळाल्यानंतरही सोमवारी कामकाजाच्या पहिल्या दिवशी शहरातील अनेक शासकीय कार्यालये ओसाड दिसून आली.
ठळक मुद्देकर्मचारी दिवाळीच्या सुट्यात अजूनही मग्न शासकीय कार्यालयातील अनेक खुर्च्या रिकाम्या