नागपूर : संपकाळात बडतर्फ करण्यात आलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने घेतला. या निर्णयाचा लाभ ठिकठिकाणच्या ११८ कर्मचाऱ्यांना मिळणार असून, त्यात नागपूर जिल्ह्यातील पाच कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी ४ नोव्हेंबरपासून संप पुकारला होता. तब्बल ५४ दिवस चाललेल्या या संपादरम्यान एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्याही केली होती. तर संपकाळात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला चढवला होता. परिणामी महामंडळाने एसटीच्या ११८ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले होते.
५४ दिवसांनंतर हा संप मागे घेण्यात आला अन् आता एसटी पूर्वीसारखी धावत आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान संपकाळात करण्यात आलेली एसटीच्या ११८ कर्मचाऱ्यांवरील बडतर्फीची कारवाई मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे ठिकठिकाणच्या बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे बडतर्फीची कारवाई झालेल्यांमध्ये गणेशपेठ, नागपूर आगारातील चार तर काटोल आगारातील एक असे एकूण पाच कर्मचारी आहेत. त्यांना या निर्णयामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे.
अद्याप लेखी आदेश नाहीशुक्रवारी सरकारने हा निर्णय घेतला असला तरी त्यासंबंधीचे लेखी आदेश अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. आदेशानंतरच बडतर्फ कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतले जाईल, असे येथील एसटी अधिकाऱ्यांचे मत आहे.