नागपूर - नागपूर शहर व जिल्ह्यात १३ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे घर व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या नुकसानाचा अंदाज घेऊन त्वरित मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताच प्रशासन कामाला लागले आहे. क्षतिग्रस्त झालेल्या घरांच्या नुकसानापोटी ४८ हजार १७७ क्षतिग्रस्त व्यक्तींना एकूण ५ कोटी ३८ लाख ३ हजार ९० रुपयांची खावटी मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरात वाहून मृत्यू झालेल्या जरिपटक्याच्या कस्तुरबानगरातील रेखा अनंत नेवारे व काचीपुरा येथील मुलुखराज भीमाजी मसराम यांच्या कुटुंबीयांची रविवारी भेट घेऊन सांत्वन केले. तसेच प्रत्येकी चार लाख रुपयांचा मदतीचा धनादेशही सोपविला. नागपूर शहरात कस्तुरबानगर, रिमा नगर, गोदावरी नगर, झिंगाबाई टाकळी, भदन्त कौशल्य नगर, वेले नगर, पांडुरंग नगर, काचीपुरा, सोनिया गांधी नगर भागाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सोमवारी वनदेवी नगर, संघर्ष नगर आणि पांढराबोडी येथे सर्वेक्षणासाठी चमू पाठविण्यात येणार आहे. यासाठी काटोल, उमरेड, हिंगणा व नरखेड तालुक्यातील ३४ तलाठी नागपुरात सर्वेक्षणासाठी युद्धपातळीवर कामाला लावले आहेत. नागपूर शहराचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर घरांच्या स्थलांतरापोटी १० कोटी रुपयांची खावटी ३५ हजार कुटुंबांना मिळेल. नागपूर शहरासाठी ३५ लाख ९५ हजार रुपये खावटीची रक्कम मंजूर झाली असून सोमवारी ती बँकेत जमा होईल. नागपूर ग्रामीण भागातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यानुसार उमरेड उपविभागात अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या ६९९ घरांच्या ३९९ लोकांना ६ लाख३ हजार ९०० रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे तर दोन मृतांच्या नातेवाईकांन ८ लाख रुपयाची मदत देण्यात येत आहे. मौदा उपविभागात १ हजार २२३ घरे क्षतिग्रस्त झाली आहे. या घराच्या स्थलांतरापोटी २८ हजार २५० लोकांना २ कोटी ८५ लाख रुपयांची खावटी मंजूर करण्यात आली आहे. सावनेर उपविभागात ६१२ घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी १ हजार ५८८ लोकांना २७ लाख रुपयाची खावटी मंजूर करण्यात आली आहे. लोकमतने मांडल्या पूरग्रस्तांच्या व्यथा१३ आॅगस्ट रोजी नागपुरात अतिवृष्टी झाली. शहरात आणि ग्रामीण भागात हाहाकार माजला. नदीकाठावरील गावांना फटका बसला. नागपूर शहरातही काही वस्त्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात एकूण ११ जणांचे जीव गेले. शेकडोंचे संसार उघड्यावर आले. हजारो बेघर झाले. लोकमतने पुढाकार घेऊन पुरामुळे प्रभावित झालेल्या भागाचा दौरा केला. पुरामुळे झालेले नुकसान व पूरग्रस्तांच्या व्यथांकडे प्रशसानाचे लक्ष वेधले. लोकमतच्या पुढाकाराने शासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले. पालकमंत्री, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दौरे केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: पूरपरिस्थितीची माहिती घेऊन मुंबईवरून सूचना देत होते. रविवारी त्यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली. २६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान जिल्ह्यात २६ हजार ८५३ हेक्टर क्षेत्रातील पिकांना अतिवृष्टी व पुराचा तडाखा बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाने प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यात सावनेर तालुक्यातील ११ हजार ४६९ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. येत्या दोन दिवसात पीक नुकसानाचा अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले सरकार
By admin | Published: August 17, 2015 2:48 AM