नागपूर : शासकीय विज्ञान संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स)ची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. हॅकर वेबसाईटवर भारताविरोधात अजेंडा चालवत आहेत. परंतु, वेबसाईट कोणी हॅक केली याची माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकली नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मॅसेजनुसार मलेशियातील एका कट्टरपंथी संघटनेने ही वेबसाईट हॅक केली असून त्यावर भारताविरोधातील संदेश प्रसारित करण्यात येत आहेत.
वेबसाईट हॅक झाल्याबाबबत शासकीय विज्ञान संस्थेच्या संचालक डॉ. अंजली राहाटगावकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याला दुजोरा दिला. तसेच वेबसाईटची देखभाल करणाऱ्यांना याची माहिती देण्यात आली असल्याचे सांगितले. सोमवारी सायबर सेलकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली जाईल. सूत्रानुसार हॅकर्सने याशिवाय काही शासकीय कार्यालयांच्या वेबसाईटसुद्धा हॅक केल्या आहेत.
सायबर सेलचे पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी सांगितले की, सध्या तरी त्यांच्याकडे यासंदर्भात कुठलीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास पुढची कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे संस्थेत सध्या प्रवेश प्रक्रियेचे काम सुरू आहे. प्रशासकीय माहिती त्यात देण्यात आलेली आहे.