- संस्कार भारतीचा ‘मिशन संवेदना’ उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाने उद्भवलेल्या परिस्थितीत आणि टाळेबंदीमुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. हतबल होऊन आत्महत्येचे पाऊल उचलले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने कलावंतांना तातडीने मदत करण्याची मागणी संस्कार भारती, विदर्भच्या वतीने करण्यात आली आहे.
कोरोना काळात गेल्या वर्षभरापासून सर्व जाहीर सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आहे. नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, मूर्तिकला, लोककला, कीर्तन, बॅन्ड पथक या सगळ्या कलाप्रकारातील कलावंत घरी बसले आहेत. उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन बहुतांश कलाकारांकडे उपलब्ध नाही. कुठल्याही सामाजिक सुरक्षा योजना, आरोग्य विमा, पेन्शन योजना यापासूनही ते वंचित आहेत. वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनाही बहुतांश जिल्ह्यांत बंद आहे. अशा परिस्थितीत जगण्याचेच तीव्र संकट कलाकारांसमोर उभे आहे. त्याअनुषंगाने शासनाने कलावंतांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावी, अशी मागणी विदर्भ प्रांत अध्यक्ष सुरमणी डॉ. कमल भोंडे व प्रांत महामंत्री आशुतोष अडोणी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘मिशन संवेदना’ हा उपक्रम राबविण्यात येत असून, या माध्यमातून समाजातील धनी नागरिकांनी कलावंतांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
.....................