लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : थकीत वीजबिलापाेटी महावितरण कंपनीने गावांमधील पथदिवे आणि पाणीपुरवठा याेजनांचा वीजपुरवठा खंडित करायला सुरुवात केली आहे. थकीत बिलांची रक्कम माेठी असल्याने ती बिले भरणे ग्रामपंचायतच्या आर्थिक आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांची गैरसाेय टाळण्यासाठी ही बिले राज्य शासनाने भरावे, अशी मागणी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी खंडविकास अधिकारी अनिल नागणे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
ही थकीत बिले १५व्या वित्त आयाेगातून ग्रामपंचायतींना प्राप्त हाेणाऱ्या निधीतून भरण्याचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे. परंतु, वित्त आयाेगाच्या माध्यमातून मिळणारा निधी आणि थकीत बिलांची रक्कम याचा ताळमेळ बसत नाही. शिवाय, हा निधी विकास व इतर कामांवर खर्च करणे बंधनकारक आहे. हा निधी नियाेजित कामांवर खर्च न केल्यास ती कामे रखडणार असून, त्यातून पुन्हा नागरिकांची गैरसाेय हाेणार आहे. त्यामुळे ही बिले राज्य शासनाने भरावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिष्टमंडळात सरपंच परिषदेचे जिल्हा संपर्कप्रमुख कोदेगाव सरपंच किशोर गणवीर, संदीप जीवतोडे, ललित चौरेवार, मंगल कडनायके, शालू रामटेके, बालकदास मंडपे, त्र्यंबक सहारे, लोकेश डोहळे यांच्यासह अन्य सरपंचांचा समावेश हाेता.