नागपूर : नागपुरातील मिहान एअर कार्गाे हबचा लगतचे राज्य आणि संपूर्ण विदर्भातील कृषी आणि संबंधित माल विदेशात पाठविण्याचा थोडाफार उद्देश यशस्वी झाला, पण पूर्ण क्षमतेने उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे नाशवंत मालाची आयात-निर्यात करण्यास इच्छुक असलेल्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
एअर कार्गाेचे भाडे प्रवासी भाड्याच्या १५ ते २० पट आहे. आखाती देशाच्या अटी आणि नियमानुसार प्रक्रिया आणि पॅकिंग करून माल पाठवावा लागतो. या संदर्भात आयात-निर्यातदारांमध्ये जागरूकतेचा अभाव आहे. सरकारने एअर कार्गाेला प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी द्यावी आणि राजकीय नेत्यांनी नागपुरातून आंतरराष्ट्रीय दर्जाची एअर कार्गाे सेवा कशी उपलब्ध होईल, याकडे लक्ष देण्याची व्यावसायिकांची मागणी आहे.
सध्या नागपुरातून दरदिवशी ३० ते ३२ विमाने वेगवेगळ्या शहरात उड्डाणे भरतात. नागपुरातून शारजाह व दोहा ही आंतरराष्ट्रीय उड्डाणे आहेत. कृषी माल काहीच तासात विदेशात पोहोचू शकतो. एका एअर कार्गाेतून ४ ते ५ टन माल पाठविला जाऊ शकतो.
विदर्भातून नाशवंत मालाची निर्यातविदर्भातून कॉन्कोरच्या माध्यमातून धान्य, लाल मिरची, कापड, प्लॉस्टिक आणि अन्य मालाची निर्यात होते. तर कृषी आणि संबंधित नाशवंत मालाची निर्यात एअर कार्गाेद्वारे होते. विमानातून संत्री, फळे, भाज्या, सजावटीची फुले आणि मिठाईसुद्धा अन्य देशांमध्ये पाठविली जाते. पण येथील अत्याधुनिक सुविधांचा मर्यादित अर्थात १० टक्केच उपयोग होतो. मालाचे भाडे परवडणारे असल्यास मालाची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ शकेल.
निर्यातीत क्षेत्रात प्रचंड संधीविदर्भात जवळपास दीड हजार आयात-निर्यातदारांची नोंद आहे. त्यांना जागरूक करण्यासाठी चेंबरतर्फे वर्षभरात पाच ते सहादा कार्यक्रम घेण्यात येतात. पण त्यांची उपस्थिती अल्प असते. अजूनही ते जुन्याच पद्धतीने व्यवसाय करतात. या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत.- अश्विन मेहाडिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.
दर्जा राखण्यासाठी प्रशिक्षण आवश्यकविदेशात असलेल्या कृषी मालाची मागणी, दर्जा आणि अटी-नियमांचे पालन करण्यासाठी आयात-निर्यातदारांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. व्यवसाय वाढीसाठी सरकारने भाड्यात सबसिडी द्यावी. त्यामुळे मालाला किंमत मिळेल आणि व्यापारी निर्यातीसाठी पुढे येतील.- नितीन लोणकर, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन.
सवलतीमुळेच वाढणार निर्यातीत व्यवसायमिहानमधील एअर कार्गाे हबच्या माध्यमातून कृषी मालाची निर्यात सरकारने मोठी सवलत देऊ केल्यास वाढू शकतो. यामुळे विदेशी चलन भारतात येईल. नागपूर देशाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने लगतचे राज्य आणि विदर्भात कृषी मालाची मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ शकते.डॉ. दीपेन अग्रवाल, अध्यक्ष, चेंबर ऑफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अॅण्ड ट्रेड (कॅमिट).