नागपूर : देशभरातील अनाथालयातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी केंद्र सरकारने उचलावी, अशी मागणी खा. कृपाल तुमाने यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मंगळवारी दिल्ली येथे भेटून केली. सोबत १८ वर्षांनंतर लग्नापर्यंत या मुलींना अनाथालयातच राहू द्यावे, असेही निवेदन केले.
खासदार तुमाने म्हणाले, भारतात सुमारे साडेतीन कोटी मुले अनाथ असून, दरवर्षी यात भर पडत आहे. या विषयी निती आयोगाने अद्याप सर्वेक्षण केले नाही व त्याबाबत माहिती गोळा केली नाही. युनिसेफच्या संकेतस्थळावर (वेबसाइट) भारतातील अनाथ मुलांची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. देशभरात गैरसरकारी संस्था अनाथालये चालवितात. मात्र येथे असलेल्या अनाथांना १८ वर्षांचे झाल्यावर अनाथालय सोडावे लागते. यानंतर खऱ्या अर्थाने अनाथांना समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषत: मुलींची स्थिती अधिकच बिकट होते. दरवर्षी मोठ्या संख्येत महिलांच्या अपहरणाच्या घटना समोर येतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा नारा दिला आहे. योग्य वराचा शोध घेऊन त्यांच्या लग्नाची जबाबदारी सरकारने घ्यावी सोबतच त्यांच्या लग्नापर्यंत अनाथालयात ठेवण्यात यावे. शिवाय त्यांच्या लग्नाचा खर्च केंद्र सरकाने उचलावा, अशी अशी मागणी खासदार तुमाने यांनी केली.
अतिवृष्टीग्रस्तांना एकरी ५० हजारांची मदत द्या
- अतिवृष्टी, संततधार पाऊस व पुरामुळे शेतकऱ्यांना अभूतपूर्व नुकसान झाले आहे. अडचणीत सापडलेल्या बळीराजाला तातडीने एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी तुमाने यांनी अमित शहा यांच्याकडे यावेळी केली.