लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर:वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्गावर लवकरात लवकर ट्रेन धावावी यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खास प्रयत्न करीत आहेत. या प्रकल्पाला कोणतीही अडचण येऊ नये किंवा काम थांबू नये म्हणून सरकारने 'स्पेशल वॉर रूम' तयार केली आहे. त्यातून कामाच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेतला जात आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील व्यापार-उद्योगाला भरभराटीस नेण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. अर्थात, हा प्रकल्प दोन्ही भागांच्या विकासाची गाडी अधिक गतिमान करू शकतो, हे ध्यानात घेऊन सरकारने वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेला गती देण्यासाठी 'स्पेशल वॉर रूम' तयार केली आहे. कोणत्या कामासाठी कुठली अडचण आहे, ते तपासले जाते. ती अडचण तातडीने दूर केली जात असल्यामुळे गेल्या काही दिवसांत हा प्रकल्प गतिमान झाला आहे. म्हणूनच २८४ किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गाच्या एकूण कामापैकी ३८.६१ टक्के काम आता पूर्ण झाले आहे. उर्वरित काम झपाट्याने पूर्ण व्हावे आणि लवकर वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेगाडी सुरू व्हावी म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त सचिव भूषण गगराणी हेसुद्धा खास लक्ष ठेवून आहेत.
लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांचा हा रेल्वे मार्ग ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. या प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी ते सर्वच संबंधितांशी वेळोवेळी चर्चा करून सातत्याने पाठपुरावा करीत असतात.