नागपूर : संभाजीनगरमघ्ये वज्रमूठ सभा होऊ नये म्हणून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार पुरस्कृत होता. नागपुरातही तोच प्रयत्न होत आहे, असा थेट आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. लाखांची सभा होणार आहे, म्हणून काही लोकांना पोटशूळ उठलं आहे. या सभेची विरोध केला जातोय. नागपुरातील सभा गर्दीचा उच्चांक मोडणारी ठरेल, असा दावाही त्यांनी केला.
राऊत हे मंगळवारी रात्री नागपुरात दाखल झाले. त्यांनी सभा मैदानाची पाहणी केली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत नियोजन बैठकीत ते सहभागी झाले. बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी सभेच्या तयारीवर समाधान व्यक्त करीत या सभेला पूर्व विदर्भातून लाखो लोक येणार असल्याचा दावा केला. सभेत ५० हजार खुर्च्या लावल्या जातील. बाहेर सभा बघण्यासाठी स्क्रिन लागतील. मैदानाच्या परिसरात लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ, असे सांगत भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांच्यासाठी सभेत बसण्याची सोय करू, असा टोलाही त्यांनी लगावला. - हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकांना आधार देण्यासाठी वज्रमूठ सभा होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वीर सावरकर गौरव यात्रेसोबतच सावरकरांना भारतरत्न द्या, अशी मागणी करावी, असा सल्ला त्यांनी भाजपला दिला.
असंतुष्ट आमदारांसाठी अयोध्यावारी
- दीड महिन्यांपासून अवकाळी पाऊस होत आहे. हातातोंडाशी आलेली पीक उध्वस्त झाले. विदर्भातील शेकडो घरांचे नुकसान झाले. पण दुर्दैवाने मिंधे सरकारला शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी वेळ मिळाला नाही. असंतुष्ट आमदारांमघ्ये बंडखोरीची भावना निर्माण झालीय. म्हणून अयोध्यावारी करावी लागली. सदबुद्धी येऊन अयोध्या वारीनंतर शेतकऱ्यांना मदत जाहिर करतील, असे वाटत होतं पण तसं झालं नाही.