नागपूर : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणला जात आहे. दोन्ही समाजात सुरु असलेला वाद हा सरकार प्रायोजित असून आरक्षणावरुन सुरु असलेला हा धुमाकुळ सरकारने थांबवावा, असे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, भाजपाने मराठा, ओबीसी, धनगर समाजाला जी आश्वासने दिली ती पूर्ण करावीत. कोणाच्या तोंडचा घास हिसावून घेणार नाही हे सरकार म्हणत आहे. पण सरकारची भूमिकाच स्पष्ट नाही. जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केला त्यांच्या गावात त्या ठिकाणी लाठीमारचे आदेश राज्याचे गृहमंत्री ने दिले असे स्वतः म्हणतात. लाठीमार कशासाठी केला गेला होता याचा उत्तर नाही. पण पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केली,त्यानंतर हा वाद पेटला. राज्याचे मंत्री एखाद्या समूहाला उद्देशून भांडण निर्माण करीत असतील हे सर्व तर सरकार प्रणित आहे,असा आरोप त्यांनी केला.
भाजपला आरक्षण मुक्त देश करायचा आहे. ही आरएसएसची भूमिका आहे. आरएसएस आणि भाजप काही वेगळे नाही.आरक्षण प्रश्नावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून जातनिहाय जनगणना केल्यास मराठा, ओबीसी, धनगर समाजासह सर्व समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटू शकतात. काँग्रेस सत्तेत आल्यास तसा निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
वंचितच्या सभेला जाणार
- वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना निमंत्रण दिले होतेय पण ते तेलंगणात प्रचारात असल्याने मी राहुल गांधी यांचा प्रतिनिधी म्हणून वंचितच्या सभेला उपस्थित राहणार आहे. देशाचे संविधान धोक्यात आहे. जे जे संविधान व्यवस्थेला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतील त्यांच्याबरोबर काँग्रेस राहील. म्हणूनच मी या सभेला जातोय, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात ४५० रुपयात गॅस सिलिंडर का नाही ?
-राजस्थान व छत्तिसगडमध्ये भाजपाचे सरकार आल्यास ४५० रुपयांना गॅस सिलिंडर देणार अशी मोठी जाहिरातबाजी भाजपने केली आहे. भाजपाचे मोठे नेतेही ४५० रुपयांमध्ये सिलिंडर देण्याची भाषा करत आहेत. महाराष्ट्रात सध्या भाजपाचेच सरकार आहे. मग महाराष्ट्रात ४५० रुपयांना सिलिंडर का देत नाही, महाराष्ट्रातील जनतेने काय पाप केले आहे, असा सवाल पटोले यांनी केली. उज्ज्वला गॅस योजनेत केवळ २० टक्के सिलिंडर रिफील केली जातात. ही योजना फेल गेली आहे पण उज्वला योजनेच्या नावाखाली गरिबांना मिळणारे केरोसिन मात्र भाजपा सरकारने बंद केले असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘पनवती’ ट्विटवर एवढा वाद कशाला?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही पनवती म्हटलेले नाही. ते देशाचे आदरणीय पंतप्रधान आहेत. सोशल मीडियावर पनवती हा शब्द मागील दोन तीन दिवसांपासून ट्रेंड होत आहे. पनवती म्हणजे अहंकार व हा अहंकार म्हणजे पनवती गेली पाहिजे अशी सर्वांची भूमिका आहे. तोच संदर्भ ट्विटमध्ये आहे. भाजपा ते स्वतःवर घेत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.