नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स : जिल्हाधिकारी व आयुक्तांना निवेदन
नागपूर : नागपुरात १ जूनपासून बाजारपेठा सुरू करण्यासह व्यापाऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेज द्यावे, अशा मागणीचे निवेदन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांना दिले. निवेदनाची प्रतिलिपी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री नितीन राऊत यांना पाठविली आहे.
चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रातील व्यापारी गेल्या वर्षीपासून लॉकडाऊनचा मार सहन करीत आहेत. त्यामुळे नागपुरातील व्यापाऱ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे. व्यापारी वर्ग आर्थिक अडचणींमुळे मानसिकरीत्या आजारी होत आहे. व्यापारी उद्योगांतर्फे निर्मिती मालाचा पुरवठा ग्राहकांपर्यंत करतो. सोबतच व्यापारी वर्ग व्यवसायाद्वारे करांचे संग्रहण सरकारी खजिन्यात जमा करतो. त्यांच्या कराच्या भरोशावर सरकार चालते. जर व्यवसाय बंद राहिल्यास व्यापारी कर कुठून भरणार? सर्व निर्बंध व्यापाऱ्यांसाठीच का? उद्योग क्षेत्र वस्तूंची निर्मिती करेल, पण ठोक आणि किरकोळ बाजार बंद राहिल्यास वस्तूंची विक्री कुठे आणि कशी होणार हे गंभीर प्रश्न आहेत.
तीन महिने व्यवसाय बंद असल्याने, व्यापारी कर्मचाऱ्यांना वेतन देऊ शकत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. घराचे भाडे, दैनंदिन खर्च उचलणे कर्मचाऱ्यांना अशक्य झाले आहे. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आपत्ती आली आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने व्यापाऱ्यांना व्यवसायाची परवानगी द्यावी आणि सोबत गेल्या वर्षीप्रमाणे लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसानीतून बाहेर येण्यासाठी व्यापाऱ्यांना सरकारने आर्थिक पॅकेजची घोषणा करावी.
चेंबरचे सहसचिव उमेश पटेल म्हणाले, जून महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. तीन महिने दुकाने बंद राहिल्याने, पावसामुळे दुकानातील माल खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे लागेल. त्यातून त्यांना बाहेर निघणे कठीण होईल. व्यापारी महामारीने नव्हे, तर लॉकडाऊनमुळे येणाऱ्या आर्थिक समस्यांनी संपून जाईल. चेंबरचे सचिव स्वप्निल अहिरकर म्हणाले, ‘कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने, सरकारी नियमांतर्गत व्यापाऱ्यांना बाजारपेठा नियमित सुरू करण्याची परवानगी द्यावी.’ निवेदन देताना चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, सहसचिव उमेश पटेल, स्वप्निल अहिरकर, जनसंपर्क अधिकारी राजवंतपाल सिंग तुली उपस्थित होते.