नागपूर : कोविडच्या दोन लाटेत आलेल्या अनुभवानंतर राज्य शासन उद्योग, व्यापार आणि आर्थिक संदर्भात सजग असून उद्योजकांच्या हिताच्या रक्षणासाठी प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी येथे केले. शासन तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवर नियोजन करीत असून उद्योजकांनीही भविष्यात होणाऱ्या घडामोडींवर सज्ज राहावे.
उद्योजकांची बैठक सिव्हील लाईन्स येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी झाली. आयुक्तांनी उद्योजक संघटनांकडून व्हॅक्सिनेशन, सप्लाय चेन मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स, आरएटी टेस्ट, सीएसआर फंड आदींची माहिती जाणून घेतली. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे (व्हीआयए) अध्यक्ष सुरेश राठी म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात राज्य शासन आणि प्रशासनाकडून सहकार्य मिळाले. सध्या पासेस अन्य कारणांनी सप्लाय चेन आणि शहरातील कर्मचाऱ्यांना उद्योगांपर्यंत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या कार्याची प्रशंसा केली. महामारीमध्ये उद्योग आणि व्यावसायिक संघटनांना विश्वासात घेऊन आवश्यक सुविधा वेळोवेळी प्रदान कराव्यात आणि शहरातील कर्मचाऱ्यांना उद्योगापर्यंत पोहोचण्यात अडचणी येऊ नये. उद्योगातील कामगारांना व्हॅक्सिनेशन किफायत दरात उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
व्हीआयएचे उपाध्यक्ष डॉ. सुहास बुद्धे म्हणाले, उद्योगांमध्ये किफायती दरात आरटी-पीसीआर टेस्ट उपलब्ध करून द्यावी. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच ईएसआयसी आयुक्तांची बैठक बोलावून स्थिती जाणून घेण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी उद्योग सहसंचालक अशोक धर्माधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गजेंद्र भारती उपस्थित होते.