लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस महाभरतीची राज्य शासनाने घोषणा केली होती. मात्र आता ही महाभरतीची घोषणा रद्द करून राज्य शासनाने हजारो युवकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. अगोदर ऊर्जामंत्र्यांनी वीजबिल माफी व सवलतीची घोषणा करून माघार घेतली. आता गृहमंत्र्यांनीदेखील महाभरतीसंदर्भात त्यांचीच री ओढली आहे, अशी टीका भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे.
निर्णय घेणे व त्यानंतर ‘यू टर्न’ घेणे ही या सरकारची सवय झाली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील मंत्री आघाडीवर आहेत. मंत्र्यांचे खाते असले तरी स्वतंत्र निर्णय घेण्याची त्यांच्यात क्षमता नाही. केवळ प्रसारमाध्यमांसमोर मोठमोठे दावे करतात व त्यानंतर मात्र मूग गिळून गप्प बसतात. बेरोजगार युवकांना पोलीस भरतीच्या नावावर वारंवार स्वप्न दाखविणे व नंतर रद्द करणे हा त्यांच्यासोबत केलेला विश्वासघातच असल्याचे खोपडे म्हणाले. याअगोदर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ‘लॉकडाऊन’च्या काळातील वीज बिल सवलतीसंदर्भात जनतेची फसवणूक केली, असा आरोपदेखील खोपडे यांनी केला.