नागपूर : राज्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्याची राज्य सरकारची तयारी हे महाविकास आघाडीचे षडयंत्र आहे. केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाचा धसका घेतला आहे. राज्यातील शेतकरी पेटून उठू नये यासाठी केंद्राशी हातमिळावणी करून महाविकास आघाडी सरकार लॉकडाऊनची तयारी करत आहे, असा आरोप किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रासंदर्भात माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. राज्यातील शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे मोर्चे टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकार लॉकडाऊन लावून पळवाट शोधू पहात आहे. कोरोनाचे कारण देत मुख्यमंत्र्यांनी वर्षभर स्वत:ला जनतेपासून दूर ठेवले. जनतेला तोंड दाखवायचे नसल्याने नोकरशाहीच्या हातात कोरोनाचे हत्यार मिळाले आहे. अधिवेशन थोडक्यात गुंडाळण्यासाठी सल्लागारांच्या म्हणण्यावरून कोरोनाच्या कृत्रिम रुग्णावाढीची आकडेवारी दाखवली जात आहे. प्रत्यक्षात कोरोना हे एक नाटक असृून सरकारने त्याचा वापर आपल्या हितासाठी केल्याचा आरोप त्यांनी केला. अनलॉकनंतर राज्य सरकारने योग्य धोरण न आखल्याने राज्याची अर्थव्यवस्था रसातळाला गेल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यात आणि देशात राजकीय पक्षांचे मेळावे, निवडणुका, विवाह समारंभ लाखों-हजारोंच्या उपस्थितीत होत आहे. दिल्लीत लाखो शेतकरी एकत्रित येऊन आंदोलन करीत आहे. तिथे कोरोनाचा उद्रेक होत नाही तर जनतेच्या प्रश्नांपासून दूर पळण्यासाठी हा उद्रेक आहे. मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे अमलात आणत आहे. यामुळे देशातील शेतकरी तीन महिन्यांपासून दिल्लीत शांततेने आंदोलन करीत आहे. असे असूनही राज्यातील सरकारची शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट दिसत नाही. यवतमाळात होऊ घातलेली सभा दबावतंत्र वापरून सरकारने उधळली. त्यामुळे हे सरकार काळ्या कायद्यासोबत की शेतकऱ्यांसोबत आहे, हे स्पष्ट व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेला किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अविनाश काकडे, आरटीआय कार्यकर्ता मोनित जबलपुरे, निवृत्त सैनिक शेषराव मरोडिया आणि राजू मिश्रा उपस्थित होते.