लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या एकमुखी मागणीचा विचार करीत बुधवारी विविध व्यापारी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारपासून सर्व प्रकारची दुकाने सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी बुधवारी राज्यातील सर्वच व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी नागपुरातून बैठकीत भाग घेतला. व्यापाऱ्यांची मते मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतली. भरतीया बैठकीत म्हणाले, सर्वांना एकत्रितपणे कोरोना आजाराविरुद्ध लढायचे आहे. वेळेची मर्यादा ठेवून दुकाने सुरू करावीत. खासगी कार्यालये आणि शासकीय कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवाव्यात. मुख्यमंत्र्यांनी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकली. ते म्हणाले, आपल्याला एकत्रितपणे कोरोनावर मात करायची आहे. व्यापाऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवर विचार करू. दोन दिवसांचा वेळ द्यावा. त्यावर उचित निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या संकेतामुळे शासन व्यापाऱ्यांसमोर नमल्याचे दिसून आले. शुक्रवारपासून दुकाने सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भरतीया म्हणाले, शासनाने ५ एप्रिलच्या रात्रीपासून कठोर निर्बंध लावून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. अर्थात शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावले. हा निर्णय व्यापाऱ्यांसाठी आश्चर्यकारक होता. या निर्णयाचा महाराष्ट्रातील व्यापारी विरोध करीत आहेत. आर्थिक नुकसानीचा निर्णय मागे घेण्यासाठी अनेक व्यापारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. व्यापाऱ्यांच्या मागणीवर निर्णय घेत बुधवारी मुख्यमंत्र्यांनी व्यापारी संघटनांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.