आशिष दुबेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य आरोग्य विभागाच्या दृष्टीने नागपूर, वर्धा, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील डॉक्टर्स, नर्स व स्वच्छतादूत हे कोरोना योद्धाच नाहीत. त्यामुळेच, अतिशय धोक्याच्या काळातही जोखीम पत्करून गेल्या सहा महिन्यात सातत्याने कोरोना संक्रमितांची सेवा करत असलेल्या या जिल्ह्यातील डॉक्टरर्स, नर्स व स्वच्छता दूतांची नावे राज्यपाल कोविड योद्धा पुरस्काराच्या यादीत देण्यात आलेली नाहीत. या प्रकारामुळे या पुरस्कारांमध्येही घोटाळ्याचा वास येत आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार या पुरस्काराच्या यादीत राज्यातील अन्य जिल्ह्यांसोबतच नागपूर विभागातील चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील डॉक्टर, नर्स, स्वच्छतादूत व आरोग्य सेविकांचा समावेश करण्यात आला आहे. पुरस्कारासाठी एकूण ४२ लोकांची निवड करण्यात आली आहे. त्यांना १५ आॅक्टोबरला राजभवनामध्ये राज्यपालांच्या हस्ते पुरस्कृत केले जाईल. सूत्रांनी सांगितल्यानुसार नागपूरसह विभागातील अन्य जिल्ह्यातील डॉक्टरांची यादी पाठविण्यात आली होती. परंतु, राज्याच्या आरोग्य संचालनालयाने त्याकडे दुर्लक्ष केले. केवळ शिफारशींच्या आधारावर कोरोना योद्ध्यांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. नागपूरसह विभागातील अन्य जिल्ह्यांच्या डॉक्टर, नर्स व अन्य कोरोना योद्ध्यांंनी कोणत्याही प्रकारची शिफारस केली नव्हती. त्यामुळेच, त्यांची नावे यादीत सहभागी करण्यात आली नाही. या संदर्भात शल्यचिकित्सक डॉ. पातूरकर व आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.
कोणत्या आधारावर केली निवडपुरस्कार यादीत नाव नसल्याने गेल्या सहा महिन्यापासून कोरोना संक्रमितांची सेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्स, आरोग्य सेविका, आशा वर्कर व स्वच्छतादूतांमध्ये निराशा पसरली आहे. कोणत्या आधारावर या पुरस्कारांची योग्यता ठरविण्यात आली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरात शासकीय मेडिकल हॉस्पिटल, मेयो हॉस्टिपलसहित विविध इस्पितळांमध्ये सेवा देत असलेल्या डॉक्टर, नर्स, स्वच्छतादूतांनी हा आमच्यावर झालेला अन्याय असल्याची भावना व्यक्त केली. कोरोना संसर्गाच्या पहिल्या दिवसापासूनच सातत्याने सेवेत हे कर्मचारी मग्न आहेत. त्यासाठी ते स्वत:च्या कुटुंबापासूनही वेगळे राहून कोरोना योद्धा म्हणून रुग्णांचे उपचार करत आहेत.
सर्वात पहिले नागपुरातच सुरू झाले उपचारकोरोनाच्या आगमनापासून नागपुरातच सर्वात अगोदर कोरोना टेस्ट व उपचारांची सुरुवात झाली. चंद्रपूरमधील संक्रमितांवरही नागपुरातच उपचार झाले. क्वारंटाईन सेंटरही नागपुरातच बनविण्यात आले. तरीसुद्धा या यादीत नागपूरच्या कोणत्याही कोरोना योद्ध्याचे नाव न येणे, ही आश्चर्याची बाब आहे.सन्मानार्थ मिळेल प्रमाणपत्रसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुरस्कारादाखल राजभवनात कोरोना योद्ध्यांचा भव्य सत्कार केला जाईल. त्यांना प्रमाणपत्रासह शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देण्यात येईल. कोरोना योद्ध्यांच्या भावनेनुसार राज्यपालांच्या हस्ते सन्मानित होणे अत्यंत मानाची बाब आहे.