चंद्रशेखर बोबडे - नागपूरनागपूर, गडचिरोली आणि अमरावतीसह विदर्भातील प्रमुख जिल्ह्यातील विविध विकास योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव ४ ते ७ नोव्हेंबर या दरम्यान नागपूरमध्ये येणार असून, ते काही भागाचा दौराही करण्याची शक्यता आहे. तशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.या दरम्यान राज्यात नवे सरकार सत्तारूढ झाल्यास राज्यपालांसोबतच नवे मुख्यमंत्रीही बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.राज्यपालांच्या कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या पत्रानुसार सी. विद्यासागर राव यांचा ४ ते ७ नोव्हेंबर असा दौरा असून, त्यांचा मुक्काम राजभवनात राहणार आहे. या काळात ते नागपूर विभागातील नागपूर आणि गडचिरोली तर अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील विविध विकास योजनांचा आढावा घेतील. त्यात सध्या सुरू असलेल्या आणि काही पूर्ण झालेल्या योजनांचा समावेश आहे. या योजनांमध्ये प्रामुख्याने जलसंधारण, आदिवासी विकास, आरोग्य आणि समाज कल्याण विभागासह इतरही काही योजनांचा समावेश आहे. याबाबत आवश्यक ती सर्व माहिती संकलित करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. राज्यपाल त्यांच्या दौऱ्यात काही भागांना भेटही देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुका आटोपल्या असल्या तरी, नवीन सरकारचा शपथविधी झाला नसल्याने राष्ट्रपती राजवटीमुळे प्रशासनाची सर्व सूत्रे राज्यपालांकडेच आहे. दिवाळीनंतर नवीन सरकार सत्तारूढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यापूर्वीच्या राज्यपालांनीही गडचिरोली आणि मेळघाटातीलत आदिवासी भागांना भेटी दिल्या होत्या.(प्रतिनिधी)
राज्यपाल नागपुरात घेणार विदर्भ विकासाचा आढावा
By admin | Published: October 23, 2014 12:31 AM