लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनाच्यावतीने नागपूर येथे उभारण्यात आलेले गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्राहालय सुरू करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला गुरुवारी केंद्रीय वने-पर्यावरण व हवामानबदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.केंद्रीय वने पर्यावरण व हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली आहे. नागपूर शहराच्या वायव्येकडे असलेल्या गोरेवाडा तलाव परिसरात महाराष्ट्र शासनाने आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्राहालय उभारले आहे. या प्राणिसंग्रहालय उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून, या वर्षअखेर ते पूर्ण होणार आहे. आजच्या मंजुरीमुळे आता या कामालाही वेग येणार असून पर्यटकांना गोरेवाडा प्राणिसंग्रहालय बघण्याची मोठी पर्वणीच उपलब्ध होणार आहे. वनसंवर्धन कायद्याच्या मंजुरीनंतर डिसेंबर २०१७ मध्ये या प्राणिसंग्रहालयाच्या बांधकामास सुरुवात झाली. १० मार्च २०१९ रोजी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या बृहत् विकास आराखड्याला मंजुरी दिली होती.दरम्यान, या प्राणिसंग्रहालयात इंडियन सफारीअंतर्गत बिबटे व अस्वल या प्राण्यांच्या सफारीला मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाने १२ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला होता. या पार्श्वभूमीवर, २५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयांतर्गत कार्यरत केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन पाहणी केली होती. या अधिकाऱ्यांनी मंत्रालयाकडे आपला अहवाल सोपविला होता. त्यानुसार गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्राहालयात इंडियन सफारीला मंजुरी मिळाली असून, या सफारीच्या माध्यमातून आता पर्यटकांना अस्वल व बिबट जवळून बघता येणार आहेत.गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारी ११२ हेक्टरमध्ये विकसित करण्यात येत आहे. या सफारीमध्ये तृणभक्षक, वाघ, बिबट, अस्वल सफारीचा समावेश असणार आहे. खासगी आणि सार्वजनिक सहभागातून ५६४ हेक्टरमध्ये इंडियन, आफ्रिकन सफारी, बायो पार्क, नाईट सफारी, बर्ड पार्क विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी एस्सेल वर्ल्डने पुढाकार घेतला असून, बांधा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एफडीसीएम एस्सेल वर्ल्ड गोरेवाडा झू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. हा प्रकल्प ४५२ कोटींचा आहे. यात २५२ कोटींचा वाटा एस्सेल वर्ल्डचा असून, २०० कोटी रुपये राज्य सरकारचे राहणार आहेत.
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय सुरू करण्यास केंद्राची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:03 AM
महाराष्ट्र शासनाच्यावतीने नागपूर येथे उभारण्यात आलेले गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्राहालय सुरू करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला गुरुवारी केंद्रीय वने-पर्यावरण व हवामानबदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
ठळक मुद्देइंडियन सफारी सुरू होणार